Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवसेना युती सुसाट विजयाकडे निघाल्याचे चित्र आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी पॅनल 27 ड मधून शिंदे सेनेतून भाजपात प्रवेश केलेले महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे या पॅनलमध्ये सुरुवातीपासूनच महेश पाटील आणि मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यात तगडी लढत होणार, असे स्पष्ट संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात निवडणूक होण्याआधीच चित्र पूर्णपणे बदलले. घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पाटील यांचा रस्ता मोकळा केला.
महेश पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपात प्रवेश करत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोठी खेळी केली होती. प्रवेशावेळी त्यांनी दोन पॅनलसाठी तब्बल आठ तिकिटांची मागणी केली होती आणि ती भाजपाने पूर्ण केल्याची चर्चा आहे. त्यानुसार पॅनल 27 मध्ये भाजपाचे मंदा पाटील, महेश पाटील, अभिजित थरवळ आणि सायली विचारे हे उमेदवार रिंगणात उतरले होते.
यापैकी मंदा पाटील यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या विरोधात असलेल्या मनसेच्या सुवर्णा पाटील यांनी माघार घेतली होती. आता महेश पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे या पॅनलमधील दुसरा विजय भाजपाच्या पारड्यात गेला आहे.
या पॅनलमध्ये मनसेकडून मनोज घरत हे एकमेव विरोधी उमेदवार होते. मनोज घरत हे केवळ उमेदवार नव्हते, तर ते मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष असून मनसे नेते राजू पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जातात. राजू पाटील यांचे तसेच विनोद पाटील यांचे घरत यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचेही राजकीय वर्तुळात ओळखले जाते.
डोंबिवलीमध्ये मनसेला गळती लागल्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतील संघटनात्मक फेररचना करत घरत यांच्याकडे पुन्हा शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.
घरत यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या विद्यार्थी सेनेला नवसंजीवनी मिळाली होती. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे पॅनल 27 मध्ये महेश पाटील विरुद्ध मनोज घरत अशी सरळ, पण चुरशीची लढत पाहायला मिळेल, असे वातावरण होते. मात्र, ऐनवेळी मनोज घरत यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडाला आहे. घरत यांनी माघार का घेतली? त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून दबाव होता का? की ही माघार ‘आतल्या गोटातील’ राजकीय समझोत्याचा भाग होती? असे अनेक प्रश्न आता प्रभागात आणि शहराच्या राजकारणात खुलेपणाने चर्चिले जात आहेत.
दरम्यान, भाजपाने दुसऱ्या आघाडीवरही असाच धक्का विरोधकांना दिला आहे. पॅनल क्रमांक 26 मधून भाजपाचे मुकुंद पेडणेकर यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राहुल भगत रिंगणात होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने पेडणेकर यांचा मार्ग मोकळा झाला.
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची ताकद दिसते आहे. या महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी जोर लावला आहे. मात्र, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजप-शिवसेनेच्या पारड्यात ठाकरे बंधूंनी टाकल्याची चर्चा आहे. येथे जुने निष्ठवान शिवसैनिक असताना त्यांनासोबत घेत लढण्याची गरज असताना या महापालिकेकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार कार्यकर्ते खासगीत करत आहेत. त्यामुळे या पालिकेत मित्रपक्ष शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कोण वरचढ ठरणार याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.