
Kurla Bus Accident: महायुती सरकारच्या सत्तास्थापनेनंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संपल्यानंतर मुंबईतून (Mumbai )एक अंगाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने मार्केटमध्ये घुसलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली असून या भीषण अपघातात (Kurla Accident Latest News) 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
मुंबईत सोमवारी (ता.9) रात्री ही घटना घडल्याचे समोर येत आहे. भरधाव बेस्ट थेट तुंडंब गर्दीने भरलेल्या मार्केटमध्ये घुसली. यानंतर या बसने रिक्षांसह इतर वाहनांनाही जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात काही जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकं जमा झाली.या घटनेची माहिती मिळताच तिथे पोलीसही दाखल झाले आहेत.
कुर्ला एलबीएस रोडवरील या भीषण अपघाताच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून युध्दपातळीवर बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच पोलीस (Police) या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
अपघातावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी संबंधित बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती दिली आहे.गजबजलेल्या एलबीएस रोड अशा परिसरात इतक्या भरधावपणे बस चालवण्यात आली. यात बसने अनेक वाहनांना जबर धडक दिली.या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे.
या अपघातानंतर शिवसेनेचे आमदार महेश कुडाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून रुग्णांना सर्वतोपरी मदत करणं हेच सध्या महत्त्वाचं आहे. या अपघातात जवळपास 30 ते 35 लोकांना मार लागल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
यावेळी आपण स्वत:घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचंही कुडाळकर यांनी सांगितले. तसेच या अपघाताची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या 10 ते 12 जणांना चिरडले, त्यात 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात बुद्ध कॉलनीजवळील आंबेडकरनगर येथे झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.