Mumbai News, 09 August : महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर सतत टीका करणाऱ्या विरोधकांनी आता मात्र ती योजना तशीच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
शिवाय महिलांना दिल्या जाणाऱ्या सध्याच्या रकमेत वाढ करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यात दिले जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आता पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता या योजनेला विरोध न करता ती तशीच पुढे चालवण्यासाठी विरोधक देखील सरसावले आहे. तर ही योजना आम्हीच सुरु केल्याचं काँग्रेसने (Congress) मविआच्या नेत्यांना सांगितलं आहे.
महिलांच्या हृदयात जागा करत सत्तेत येण्याचा मार्ग कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांना योजनेने दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संयुक्त जाहीरनामा तयार करताना काँग्रेसने लाभार्थी महिलेला दरमहा 2 हजार रुपये देण्याबाबतचा अहवाल मागवण्याचा मनोदय जाहीर केला आहे.
तर लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत मोठा फटका बसलेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना फायद्याची ठरणार असल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 40 लाख महिलांनी या योजनेचे अर्ज भरले आहेत. मध्यप्रदेशात हा प्रस्ताव देणाऱ्या नियोजनकार सुनील कोडुगुलु यांच्या सुचनांकडे कमलनाथ यांनी दुर्लक्ष केले. मात्र भाजपचे नेते मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ही योजना सुरु करुण राज्यात आपली सत्ता खेचून आणली.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर या योजनेचा किती ताण पडेल याबाबत अद्याप कोणत्याही काँग्रेसनेत्याने प्रकाश टाकलेला नाही .त्यामुळे ही योजना काँग्रेसचीही लाडकी असल्याचं बोललं जात होते. निवडणूक प्रचार समितीत यावर शिक्कामोर्तब झाले असून येत्या आठवड्यात प्रचार समितीची बैठक होईल त्यावेळी बहिणींना किती ओवाळणी द्यायची या आकड्यावर विचार होणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी कॉंग्रेसने व्यापक योजना तयार केली आहे. विद्यमान सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणे ,भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणणे याबरोबरच पर्यायी योजनांची मांडणी करणे यावर भर दिला जाणार आहे. ही मोहिम मित्रपक्षांसमोर उलगडून दाखवली जाईल.
सध्या महायुती दिड हजार रुपये दर महिन्यात देणार असल्याने त्यात वाढ करुन रक्कम दोन हजार करावी असा विचार पुढे येत आहे. महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी महिला या सवलतीच्या लाभार्थी ठरतील असा अंदाज असून या योजनेच्या अंमलबजावणीमुळे तिजोरीवर 46 हजारांचा वाढीव भार पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या वर्षी राज्य सरकारने या योजनेसाठी 35 हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर आघाडीन या योजनेसाठी 2 हजार रुपये द्यायचे ठरवल्यास हा आकडा वर्षाला 60 हजार कोटी ओलांडणार नसल्याचे सांगितलं जात आहे. अर्थतज्ञांनी या योजनेच्या प्रारुपावर आक्षेप घेत हे अनुत्पादक खर्च असल्याचे मत नोंदवले आहे. तर उच्च न्यायालयाने नेहमीचे खर्च झेपत नाहीत तर ही योजना कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मात्र, मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. आसाम ,पश्चिम बंगाल ,आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ही योजना लागू झाली आहे. शिवाय या योजनेची सुरुवात काँग्रेस शासित राज्यात झाल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं आहे. तर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणींसाठी 2 हजार रुपयांच्या मासिक ओवाळणीचा आम्हीही विचार करत असल्याचं सांगितलं आहे.
कर्नाटकात महिलांना दर महिन्याला गृहलक्ष्मी नावाने प्रसिध्द असलेल्या योजनेअंतर्गत 2 हजार तर तेलंगणात अडीच हजार रुपये दिले जातात. या दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार या घोषणांनंतरच सत्तेत आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस ही योजना आपण पुढे सुरु ठेवत महिलांना 2 रुपये देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्याची दाट शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.