Chitra Wagh : चित्रा वाघांच्या सोयीच्या नैतिकतेचा बुरखा न्यायालयाने टराटरा फाडला

bombai high court slams chitra wagh : विरोधी पक्षांच्या सरकारमध्ये एखादा मंत्री गुन्हेगार असतो आणि आपल्या पक्षाच्या सरकारमध्ये तो तसा नसतो, हे लोकांसमोर बोलणे राजकारणाचा भाग म्हणून एक वेळ ठिक, मात्र अशीच भूमिका न्यायालयात मांडली तर... न्यायालयाने अशाच एक प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहेत.
chitra wagh mumbai high court
chitra wagh mumbai high courtsarkarnama
Published on
Updated on

विरोधी पक्षांतील नेत्यांवर गंभीर आरोप करायचे आणि ते आपल्या पक्षात आले की त्याकडे दुर्लक्ष करायचे... गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने हे चांगलेच अनुभवले आहे. असे प्रकार ढिगांनी घडले आहेत. अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची कानउघाडणी केली आहे.

महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, अशी टिपण्णी न्यायालयाने केली आहे.

पुण्यात एका तरुणीने 2021 मध्ये इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे राजकारणातील नैतिकतेचा जणू आपण ठेकाच घेतला आहे, अशा आविर्भावात वावरणाऱ्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत तुटून पडल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव या तरुणीच्या आत्महत्येशी जोडले गेले होते.

संजय राठोड ( Sanjay Rathod ) यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणी चित्रा वाघ आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी लावून धरली होती. पत्रकार परिषदा घेऊन संजय राठोड आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. अखेर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी याचिका चित्रा वाघ यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात केली होती. आता ही याचिका मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलाने न्यायालयात केली. त्यावरून न्यायालयाने चित्रा वाघ यांची कानउघाडणी केली आहे.

chitra wagh mumbai high court
Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या शिलेदाराचं जुनं प्रकरण नाना पटोले उकरून काढणार

संजय राठोड हे महायुती सरकारमध्ये आता मंत्री आहेत. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या राजकीय नैतिकतेच्या आविर्भावाच्या चिंधड्या मागेच उडाल्या आहेत. न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, नंतर राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदे शिवसेनेतून 40 आमदारांसह बाहेर पडले, सूरतमार्गे गुवाहाटीला गेले. या प्रवासात संजय राठोड त्यांच्यासोबत होते. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये संजय राठोड पुन्हा मंत्री झाले.

संजय राठोड यांना महायुती सरकारमध्ये मंत्री केल्याबद्दल चित्रा वाघ यांच्यावर माध्यमांनी, विरोधी पक्षांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. एकाही वेळेला त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नव्हते. काहीवेळा तर त्यांनी आक्रस्ताळेपणाचे जाहीर प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्यांची कोंडी झाली होती. ही कोंडी कायमची फुटावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या अंगलट आले आहेत. न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या भूमिकेची चांगलीच चिरफाड केली आहे. या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर संजय राठोड यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली होती.

सरकार बदलले तशी चित्रा वाघ यांची भूमिका मवाळ झाली. ही याचिका मागे घेण्याची मुभा द्यावी किंवा ती निकाली काढावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यामुळे न्यायालयाचा पारा चढला. त्यावरून न्यायमूर्तींनी चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले. राजकीय नेत्यांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून न्यायालयांना राजकारणात ओढू नये. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. न्यायालय हा राजकारण करण्याचा मार्ग नाही, असे खडेबोल सुनावत न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे नरमाईची भूमिका घेत चित्रा वाघ यांच्या वकिलाने याचिका मागे घेणार नसल्याचे न्यायालयात सांगितले.

chitra wagh mumbai high court
Chitra Wagh : सचिन वाझेवरून चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल; म्हणाल्या, वसुली गँगची...

चित्रा वाघ यांनी यावरही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, प्रकरण मागे घ्यावे, अशी सूचना मी वकिलांना केली नव्हती, असे त्या म्हणाल्या आहेत. "आशिलाच्या सूचनेशिवाय वकील अशी मागणी करतील, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर बाहेर टिपण्णी करणे योग्य होणार नाही," असे सांगत चित्रा वाघ यांनी विरोधकांवर पुन्हा निशाणा साधला आहे. मनासारखा निकाल लागला की, लोकशाही जिंकली आणि विरोधात निकाल लागला की न्यायालयांवर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे कठीण असते, असे त्या म्हणाल्या आहेत. असे बोलून त्यांनी प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे चित्रा वाघ यांच्या राजकीय नैतिकतेचा बुरखा टराटरा फाटला आहे, हे नाकारता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com