संजय परब-
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी अजून काथ्याकूट करत असताना भाजपने तयारीवर शेवटचा हात फिरवायला घेतला आहे. दोन दिवस नवी दिल्लीत सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चिंतन बैठकीत आधीच निश्चित करण्यात आलेली 35 कोटी मते आणि 325+ जागा याची आता चाचपणी केली जाईल. यात आपण कुठे मागे पडतोय आणि कुठे आता जास्त जोर मारला पाहिजे, याची रणनीती ठरवली जाईल.
संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपाने मिशन 2024 वर सर्व लक्ष केंद्रीत करण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणजे दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बोलावलेली बैठक होय. देशातील सगळे प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व मोर्चाचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. बैठकीनंतर संघटन महामंत्र्यांसोबत बैठक होईल. या दरम्यान ‘विकसित भारत संकल्प अभियान’ या मोहिमेची समीक्षा केली जाईल. भाजपाने 2024 साठी 325+ हे लक्ष्य ठेवले आहे. त्याची वर्षभरापूर्वी तयारी सुद्धा सुरू केली होती. आता निवडणुकीला चार एक महिने शिल्लक असताना आपण कुठे पोहचलोय, यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आढावा घेतील. यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपाचा कमालीचा आत्मविश्वास उंचावला आहे. मध्य प्रदेशात भाजपा सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला हरवून सत्ता मिळवली. आता लोकसभेत त्यांना विजयाची हॅट्ट्रिक करायची आहे. 2019 मध्ये भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या. आता त्यात 25 पेक्षा अधिक जागांची भर टाकण्यासाठी भाजप पुढे सरसावली आहे. विशेष म्हणजे मिशन 2024 फत्ते करण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून अमित शहा यांचे दौरे सुरू झालेत.
लोकसभा निवडणुकीसाठी अध्यक्ष नड्डा यांनी 35 कोटी मतदारांचे टार्गेट सेट केले असून या वर्षभरात लक्ष्याच्या किती जवळ गेलो असून आता विजयी धडाका देण्यासाठी पक्ष पुढे निघाला आहे. 2019 मध्ये भाजपाला 22 कोटी मत मिळाली होती. आपली मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापासून प्रेरणा घेत भाजप काही करायचे, बोलायचे म्हणून कुठलेच काम करत नाही. आपले लक्ष्य काय असावे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी काय काय करावे लागेल याची मांडणी करत भाजप निवडणुकीच्या कामाला लागते. यासाठी त्यांची आधीपासून जिल्हा कार्यालयात 300 पेक्षा जास्त कॉल सेंटर कार्यरत झाली असून जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि आमदार जनसंपर्क अभियान राबवताना घराघरात पोहचले आहेत. कॉल सेंटरमधून लोकांना फोन जाताच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या झंझावाती कामांची माहिती दिली जाते. या कॉलमध्ये समोरच्याने भाजपविरोधात मत व्यक्त केल्यास आपले काय चुकते आहे, यासाठी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते तिकडे पोहचत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश कॉल सेंटर जिल्हा पार्टी कार्यालयात आहेत. त्या माध्यमातून 50 लाख लोकांना जोडण्याचे टार्गेट आहे. पक्षासाठी सक्रीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे. याच कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. लाभार्थी सूचीमध्ये आणखी 70 लाख लोकांना जोडण्याचे उद्दिष्टय आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय भाजपकडून आपली आहे ती ताकद वाढवण्यावर भर तर दिला जात आहेच, शिवाय उत्तर प्रदेश, पंजाबपासून ते दक्षिण भारतापर्यंत इंडिया आघाडीपासून दूर असलेल्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरातील सर्व 543 लोकसभा जागांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन झोन तयार करू करून त्या सर्वांचे वेगवेगळे प्रभारी करण्याचे भाजपने ठरवले आहे. लोकसभेचे गणित लक्षात घेता उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या पक्षाची कामगिरी चांगली होते, त्यांना केंद्रात सरकार स्थापन करणे सोपे जाते, असे एक गणित आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष एसबीएसपीसोबत हातमिळवणी करतील. दोघेही जुने मित्र असून त्याचा फायदा पूर्वांचलमध्ये भाजपला होऊ शकतो. बिहारमध्ये मांझी, व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी आणि रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना भाजप आपल्यासोबत घेणार आहेत. चिराग पासवान यांचे काका आधीच एलजेपी कोट्यातून एनडीएमध्ये मंत्री आहेत. अशाप्रकारे भाजप बिहारमध्ये नितीश-लालूंच्या मोठ्या आव्हानाचा मुकाबला करतील. याचबरोबर, दक्षिणेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्याने आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत फारसे नुकसान होणार नाही, यासाठी देवेगौडांच्या पक्ष जेडीएसशी हातमिळवणी करणार आहे. भाजप आणि जेडीएस एकत्र आल्याने कर्नाटकात त्यांचे मताधिक्य 50 टक्क्यांच्या जवळपास पोहचू शकते.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ताकदीसाठी भाजप चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीसोबत युती करणार आहेत. खरेतर दोघांची यापूर्वी युती असून टीडीपीसोबत युती केल्यास आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात भाजपची ताकद वाढू शकते. याचबरोबर आणखी एक मुख्य बाब म्हणजे भाजप पुन्हा एकदा आपला एनडीएतील जुना मित्रा शिरोमणी अकाली दलाला सोबत घेण्यासाठी पावले टाकत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये समझोता होण्याची शक्यता आहे, कारण भाजपला पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपच्या आव्हानावर मात करायची असेल तर अकालींचा पाठिंबा प्रभावी ठरू शकतो. तसेच, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि दक्षिणमधून भाजपला जास्त जागा मिळाल्या तर बहुमताचा 272 चा आकडा पार करणे फारसे अवघड जाणार नाही.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.