

Keshav Upadhye BJP : महापालिका निवडणुकीसाठी आता बहुतेक राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारी अर्जही दाखल झाले आहेत. कोणत्या प्रभागातील कुणाला उमेदवारी मिळाली, याचीच चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची नाराजीही अनेक ठिकाणी उफाळून आली आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. निष्ठावंतांना डावलले असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.
भाजपमध्येही निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा सूर आता काही ठिकाणी उमटू लागला आहे. कार्यकर्त्यांकडून आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का, असा सवाल नेत्यांना केला जात आहे. त्यावरून विरोधकांकडून भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना ‘केशव-माधव’ असे म्हणत डिवचले जात आहे. ‘केशव-माधव’मधील ’केशव’ म्हणजे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये तर ’माधव’ म्हणजे माधव भांडारी.
उपाध्ये व भांडारी यांना भाजपने सातत्याने डावलल्याची भावना भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांसह विरोधकांकडूनही व्यक्त केली जाते. त्यातच आता मुंबईत भाजपने प्रवक्ते नवनाथ बन यांचा उमेदवारी दिल्यानंतर मुख्य प्रवक्ते असलेले उपाध्ये यांना सोशल मीडियात ट्रोल केले जात आहे. एकीकडे ट्रोल होत असताना उपाध्ये यांनी सोशल मीडियात राज्यभरात तिकीट मिळालेल्या प्रवक्तांची यादीच पोस्ट केली आहे.
काय म्हणतात उपाध्ये?
केशव उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपाचे ९ तरुण प्रवक्ते रिंगणात. भारतीय जनता पार्टीने येत्या महापालिका निवडणुकांसाठी तरुणाईवर ठाम विश्वास टाकत ९ युवा प्रवक्त्यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईतून नवनाथ बन, गणेश खंडकर, राणी द्विवेदी, नील सोमय्या, योगेश वर्मा, मकरंद नार्वेकर, ठाण्यातून मृणाल पेंडसे, पुण्यातून कुणाल टिळक, नागपूरातून शिवानी दाणी हे सर्व उत्साही, अभ्यासू आणि जमिनीवर काम करण्याची तयारी असलेले आहेत.
आपल्या-आपल्या वॉर्डमध्ये ठोस, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करून दाखवण्याची क्षमता या सर्वांमध्ये आहे, असा विश्वास उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे. या ९ तरुण प्रवक्त्यांना उपाध्ये यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तरुणाईच्या बळावर, विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपाध्ये यांच्या या पोस्टवरही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. तुम्ही आणि माधव भंडारी तरूण होतात, तेव्हा भाजपमध्ये नव्हता का?, असे एकाने म्हटले आहे. तुमच्या दु:खात आम्ही सामील आहोत. जुन्या माणसांना संधी का मिळत नाही, असे म्हणत एका नेटकऱ्यांनी उपाध्येंना डिवचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.