
Mumabi News, 11 Dec : महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये गृहमंत्रिपदावरून तिढा सुरू आहे.
या निवडणुकीत भाजपला 130 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्यामुळे दोन्हीकडील आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. असं असलं तरी शिंदेंच्या वाट्याला मर्यादित खाती येणार असल्याने मंत्रिपदे कोणाला द्यायची याबाबतचा मोठा पेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर (Eknath Shinde) निर्माण झाला आहे.
अशातच मंत्रिपदावरून होणाऱ्या संभाव्य नाराजीवर आता शिंदेंनी तोडगा काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता शिंदेसेनेतील आमदारांना फिरती मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. या पॅटर्ननुसार आमदारांना अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदे देण्यात येणार आहेत.
दरम्यान, महायुतीमध्ये सध्या खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. त्यानुसार पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला केवळ 8 ते 10 मंत्रिपदे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे इच्छुक आमदारांना नाराज न करता त्यांना अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारमध्ये भाजपला (BJP) जास्तीच्या जागा मिळाल्यामुळे आणि अजितदादांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. अशातच आता आमदारांच्या संख्याबळानुसार 21 ते 22 मंत्रिपदे दिली जाणार असून उर्वरित मंत्रिपदे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विभागली जाणार आहेत.
अजितदादांपेक्षा शिवसेनेचे (Shivsena) आमदार जास्त निवडून आल्याने मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे सर्वांनाच मंत्रीपदं देणं शक्य नाही. तसंच मागील मंत्रिमंडळातील नेत्यांची मंत्रीपदं कायम ठेवणं ही मोठी अडचण शिंदेंसमोर निर्माण झाली आहे. कारण मागील सरकारमध्ये चांगली कामगिरी नसणाऱ्या आणि वादग्रस्त नेत्यांना मंत्रीपदं देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे.
यामध्ये दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या नावाचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. तर गेल्यावेळी संधी हुकलेले आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक हे मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत.
त्यामुळे सर्व इच्छूक आमदारांना मंत्रिपदे कशी द्यायची आणि त्यांची नाराजी कशी दूर करायची यासाठी शिंदेंनी फिरत्या मंत्रिपदाचा तोडगा काढल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हा निर्णय त्यांच्या आमदारांच्या कितपत पचनी पडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.