Assembly Session 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली होती.
याच वादावरून महायुतीतील (Mahayuti) सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. आमदार अमित साटम आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कुणाच्या सांगण्यावरून 'बहिष्कार' टाकल्याचा सवाल उपस्थित केला.
यावेळी महायुतीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तीनवेळा सभागृह तहकूब करण्याची वेळ आली.
आमदार अमित साटम म्हणाले, "जातीच्या नावावर तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी मराठ्यांच्या आणि मराठे-ओबीसींच्या लग्नाला जात नसल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, विरोधी पक्षानं त्यावर बहिष्कार घातला. विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे."
"विरोधी पक्षाला मराठा (Maratha) आणि ओबीसी समाजाचं काही पडलेलं नाही. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास तुमचा पाठिंबा आहे का? नानाभाऊ आणि विरोधी पक्षनेत्यांनी आपली भूमिका मांडावी. विरोधकांना महाराष्ट्रात सलोख्याचं वातावरण बघवत नाही. त्यामुळे जनतेनं आणि जरांगे-पाटलांनी विरोध पक्षांची भूमिका जाणून घ्यावी," अशी टीका साटम यांनी केली.
आशिष शेलार यांनी म्हटलं, "विरोधी पक्षाला चर्चेला बोलावलं होतं, तर का आले नाहीत? ऐनवेळी कोणाचा निरोप फोन, एसएमएस आला? मराठा आरक्षणाच्या बैठकीला जाऊ नका असं सांगणारा विरोधी पक्षांचा 'बोलविता धनी' कोण? खरे चित्र समोर आले पाहिजे. समाज वाट बघत आहे. समाजाची मागणी आणि भूमिका चुकीची नाही. समाजाबरोबर एकत्र आहे, हे सांगण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सेना वेगळी भूमिका घेते."
"त्यामुळे विरोधी पक्षानं भूमिका जाहीर करावी. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचं काम केलं जात आहे. हा विषय सोडविण्याची भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली," असं शेलार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.