
Maratha protest Mumbai : मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे. आरक्षणाचा गुलाल अंगावर पडल्यानंतरच मुंबई सोडणार असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दरम्यान राज्यातील एक-एक नेता जरांगे पाटील यांची भेट घेतना दिसत आहे. आज आंदोलनाच्या तिसऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली.
सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र सुप्रिया सुळे पुन्हा परत जात असताना आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. त्यांची गाडी आंदोलकांनी आडवली. यावेळी एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा देतानाच खासदार शरद पवार यांच्याविरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मराठा आंदोलक जरी आक्रमक असल्या तरी सु्प्रिया सुळे यांनी मात्र यावेळी शांत भूमिका घेतलेली दिसली.
प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार करत सुप्रिया सुळे या हळूहळू पुढे सरकत राहिल्या. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला रस्ता मोकळा करुन दिला. दरम्यान त्या निघाल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या कारचाही पाठलाग केला. त्यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. काहीवेळासाठी आझाद मैदानावर यावेळी मोठा गोंधळ उडाला त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र काही आंदोलकांनी भान राखत सुळे यांच्या कारला वाट देखील करुन दिल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, चार दिवसांपासून काहीही खाल्लेलं नसल्यानं मनोज जरांगे यांना प्रचंड थकवा आला आहे. तब्येतीची काळजी घ्या असं सुप्रिया सुळे त्यांना म्हणाल्या. तसचं जरांगे यांचे म्हणणे होते की, आंदोलनस्थळी स्वच्छतेची आवश्यकता आहे, तसेच लाईट्सची देखील सोय करण्यात यावी त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना विनंती करा म्हणून.. याबाबत मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोलणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
जरांगे पाटील व सर्व आंदोलकांचा निरोप मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहचवण्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की, सर्व पक्षांना बोलवा, सर्वपक्षीय बैठक बोलवा किंवा हवे तर एक दिवसीय अधिवेशन बोलवा व मराठा आरक्षणावर मार्ग काढा. जर सर्वच पक्षाचे नेते आंदोलनस्थळी भेटायला येत असतील, कुणाचाच जर विरोध नसेल तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात तातडीने या संदर्भातील निर्णय घ्यावा. अधिवेशन बोलवा, चर्चा करा आणि निर्णय घेऊन टाका असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.