मराठा आऱक्षणाचे झुंजार नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारसमोर नवी अट ठेवली आहे. या नव्या अटीमुळे राज्य सरकार कात्रीत सापडले आहे. आधीच 'सगेसोयरे' या शब्दाच्या कैचीत जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला पकडले असताना आता या नव्या मागणीमुळे सरकारची पुरती कोंडी होऊ शकते.
मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाकडून आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मोठी आणि धाडसी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. एवढेच नाही तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत द्यावे, अशी ही मागणी आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या या नव्या मागणीमुळे सरकारसमोरील अडचणीत भर पडली आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने सरकारी नोकरभरती करू नये, अशी मोठी मागणी जरांगे-पाटील यांनी केली. ही अट म्हणजे सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रकार सांगितला जातो.
त्याचवेळी जरांगे-पाटील पाटील एक बाब स्पष्ट केली आहे की, जर सरकारने नोकर भरती केली तर मराठ्यांचे आरक्षण राखीव ठेवावे. जरांगे-पाटील यांनी सरकारसमोर या अटी ठेवल्याने महायुती सरकार कोंडीत सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा आंदोलकांना मुंबईत येऊ न देण्यासाठी त्यांना नवी मुंबईतच रोखण्याची सरकारची खेळी आहे. पण जरांगे-पाटील सरकारला पुरून उरल्याचे स्पष्ट झाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारने आज रात्रीपर्यंतच नवा जीआर काढावा, अशी आग्रही मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्याउपर आम्हाला त्रास देण्याचा सरकारने प्रयत्न केला तर उद्या आझाद मैदानात जाणारच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे-पाटील यांच्या या नव्या आक्रमक खेळीमुळे मराठा आरक्षणाबाबत सरकार केवळ चालढकल करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच आज चर्चेसाठी सरकारचे शिष्टमंडळ आले होते, मंत्रीमहोदय नव्हते, हे सुरुवातीलाच जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले होते.
जरांगे-पाटील यांनी दुपारी साडेबारा वाजता नवी मुंबईतल्या वाशीतील शिवाजी चौकात भाषणाला सुरुवात केली. पण साऊंड सिस्टीम बिघडल्याने त्यांनी दोन वाजता सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन वाजता सभा सुरू झाली आणि जरांगे-पाटील यांनी 3 वाजून 16 मिनिटांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आणि एकदा आझाद मैदानाकडे निघालो की 100 टक्के आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.