
Kishor Kadam : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते व कवी किशोर कदम यांनी ते राहत असलेल्या सोसायटीसंदर्भात फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन तक्रार केली होती. एका मराठी कलावंताचं घर वाचवा, माझं घर धोक्यात असून मला मदत करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
किशोर कदमांची तक्रार काय?
किशोर कदम यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की, मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये, रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.
कमिटी चौकस नसेल , सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल , PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्प सारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे.
किशोर कदम यांनी पुढे म्हटलं आहे की, मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत, कायद्याला धरून आवाज उठवतात, अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.
एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते , त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते , त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते ,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.
या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती, मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे. अशी फेसबुक पोस्ट कदम यांनी केली होती.
फडणवीसांनी दखल घेतली
किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील. असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.