Lata Mangeshkar यांचे गाणे नसल्याने `मेरा नाम जोकर` ही फ्लाॅप ठरला होता...

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वयाचे 92 व्या वर्षी निधन
Lata-Raj Kapoor
Lata-Raj Kapoorsarkarnama
Published on
Updated on

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाशिवाय भारतीय संगीतक्षेत्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. बाॅलीवूडवर त्यांच्या आवाजाचा विलक्षण प्रभाव होता आणि तो पुढे देखील कायम राहणार आहे. लता यांचा आवाज अनेकांसाठी शुभलक्षणी होता. तसेच त्यांचे नाव आपल्या चित्रपटासोबत असणे हे देखील अनेकांसाठी भाग्याचे समजले जात होते. `बाॅलीवूड`मधील पहिले शोमन ओळखले जाणारे राज कपूर आणि लता मंगेशकर यांच्यातील नातेही असेच होते. राज कपूर यांच्या प्रत्येक चित्रपटात लतादिदींचा आवाज ठरलेलाच होता. शंकर-जयकिशन ही जोडी संगीतकार आणि सोबत लतांचा आवाज असे असलेले अनेक चित्रपट हिट ठरले. त्यातून आरके स्टुडिओचा दबदबा कायम राहिला. या साऱ्या याला अपवाद एकच `मेरा नाम जोकर` (Mera Naam Joker) हा राज कपूर यांचा बिग बजेट चित्रपट.

Lata-Raj Kapoor
Lata Mangeshkar : भारतीय संगीताचा आत्मा हरपला : फडणवीस

त्या काळातील सर्वाधिक लांबीचा (तीन तास 44 मिनिटे आणि दोन मध्यंतर) असलेला हा चित्रपट राजकपूर यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. ऋषीकपूर यांचीही (बालभूमिका) भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट होता. तब्बल सहा वर्षे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. याचे आर्थिक गणित इतके बिघडले की राज कपूर यांना स्वतःचे राहत घर गहाण ठेवावे लागले होते. स्वतः राज यांची भूमिका, दिग्दर्शन, शंकर-जयकिशन यांचे संगीत असे सारे जमून आलेले होते. यात कमतरता होती एकाच बाबीची. ती म्हणजे लता मंगेशकर यांनी एकही गाणे या चित्रपटात गायले नाही. त्याला राज कपूर आणि लता मंगेशकर यांच्या वादाची पार्श्वभूमी होती. राॅयल्टीच्या मुद्यांवरून या दोघांत मतभेद झाले होते. त्यामुळे या चित्रपटात लता मंगेशकर गायल्या नाहीत. त्यांच्याऐवजी आशा भोसले यांनी यातील गाणी गायली होती. राज कपूर यांचे हे महत्वाकांक्षी स्वप्न मात्र तिकीटबारीवर फारसा प्रभाव पाडू शकले नाही. सिमी गरेवाल यांचा बोल्ड सीन असलेल्या या चित्रपटाची चर्चा प्रचंड झाली. तरीही थिएटरमध्ये गर्दी जमवू शकला नाही. त्यामुळे राज कपूर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. लताचे गाणे नसल्यामुळेच आपला चित्रपट पडला. लता मंगेशकर या आपल्यासाठी लकी आहेत. त्या गायल्या नसल्यामुळेच अपयश मिळाल्याचे राजकपूर यांना खात्री पटली.

Lata-Raj Kapoor
Lata Mangeshkar : तो स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही : मुख्यमंत्री

नंतरचा कोणताही मोठा चित्रपट सुरू करण्यासाठी राज यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. मग स्वतःचा मुलगा असलेल्या ऋषीकपूरला हिरो म्हणून `बाॅबी` चित्रपटाची निर्मिती केली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी या चित्रपटाला संगीत दिले. अपेक्षेप्रमाणे लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी होतीच. पुढे अर्थातच हा चित्रपट हिट झाला. गाणीही गाजली आणि लता या आपल्यासाठी लकी असल्याची कपूर यांना पुन्हा प्रचिती आली. त्यानंतर लता आणि राज यांच्यातील युतीने पुढे अनेक चांगले चित्रपट दिले. राम तेरी गंगा मैली, हिना या चित्रपटांसह नव्वदच्या दशकापर्यंत ही जोडी कायम राहिली.

Lata-Raj Kapoor
Lata mangeshkar इतका सोपा नव्हता लतादीदींचा संगीतमय प्रवास

यांच्यातील वादाचे प्रसंगही फारच चर्चेत राहिले होते. `सत्यम शिवम् सुंदरम्`, या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांना संगीतकार म्हणून घेणार असल्याचे राज कपूर यांनी सांगितले होते. हे बोलणे झाल्यानंतर लता या संगीत कार्यक्रमांसाठी परदेशात गेल्या होत्या. इकडे राजकपूर यांनी आपला निर्णय बदलला आणि हृदयनाथ यांच्याऐवजी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना संगीतकार म्हणून `सत्यम शिवम् सुंदरम्` या चित्रपटासाठी घेतले. परदेशाहून आल्यानंतर हे कळाल्याने लतादिदी चिडल्या. त्यांनी पुन्हा राज यांच्यासाठी गाणार नसल्याचा निर्णय घेतला. त्या वेळी पुन्हा राज चिंतेत पडले. अखेरीस लक्ष्मीकांत यांनी यात मध्यस्थी केली. प्रत्यक्ष गाणे रेकाॅर्डिंगच्या वेळी राजकपूर यांनी येऊ लतादिदींना मनवले. या चित्रपटातील गाणीही गाजली.

लतादिदींमुळे संगीत क्षेत्रात अनेक नव्या कलाकारांना, संगीतकारांना संधी मिळाला. पण राजसारख्या निर्मात्याला, अभिनेत्याला त्या आपल्यासाठी लकी वाटाव्यात, असा त्यांचा दबदबा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com