Mumbai Political News: राज्य सरकारकडून तब्बल चार वर्षांनंतर तलाठीपदासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. पण या परीक्षेतील विघ्न काही संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरुन विद्यार्थ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तलाठी भरतीतील प्रशासनाच्या सावळ्या गोंधळावर तीव्र नाराजी दर्शवतानाच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित त्यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी तलाठी भरतीच्या परीक्षेतील अडचणींवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले, राज्यात 4 वर्षानंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. दहा लाखांहून अधिक उमेदवार या परीक्षेला बसले आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला. नाशिकमधील एका परिक्षा केंद्रावर काही उमेदवारांनी गैरप्रकार केला. त्यांना पोलिसांनी अटक केली. काही परीक्षा केंद्र मॅनेज करण्याचे प्रकार घडले.
नागपूर येथील परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठविण्यात आले. वनविभागाच्या भरतीसंदर्भात देखील असेच प्रकार यापूर्वी घडले. म्हाडा भरतीमध्ये असाच गैरप्रकार झाला. त्यात 60 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पाटलांची चौकशीची मागणी...
केंद्र शासनाच्या कर्मचारी चयन आयोगाच्या धर्तीवर राज्य शासनाने स्वतंत्र आयोग स्थापन करावा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्येच गट ‘क’ व गट ‘ड’ पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करुन त्यामार्फत भरती करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
जयंत पाटील पत्रात काय म्हटलंय..?
महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4644 पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, दररोज काही ना काही अडचणी येत आहेत. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यात भरती प्रकरणात अशा घटना घडत आहेत त्याचा परिणाम उमेदवारांच्या मानसिकतेवर होत आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणारी मुले यामुळे मागे पडत आहेत. त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होत असून सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सूचना जयंत पाटील यांनी केली.
राज्यात घडलेल्या या सर्व प्रकरणांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक उमेदवारांना न्याय द्यावा. पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी कायम स्वरुपी यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तलाठी भरती(Talathi Recruitment Exam News) परीक्षेदरम्यान मात्र, अनेक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडले. तर, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला. नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यावर, काही ठिकाणी सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. हे कमी म्हणून की काय, पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.