Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलने कल्याणपर्यंत प्रवास केला. त्यांचा हा लोकल प्रवासाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शरद पवारांचे नातू आणि आमदार असलेल्या युवा नेत्याने का लोकलने प्रवास करावा, याची उत्सुकता अनेकांना लागली.
तसे अनेक मंत्री मोठे राजकीय नेतेही मुंबई लोकलने प्रवास करतात आणि त्यामागे मुंबईतील प्रचंड वाहतुकीत वेळ वाया जाऊ न देता वेळेवर मंत्रालयात अथवा एखाद्या नियोजित कार्यक्रमात वेळेत पोहाेचता यावे असेच असते. मात्र, रोहित यांनी वेगळ्याच कारणाने लोकलने कल्याणपर्यंत प्रवास केला.
याबाबत आमदार रोहित पवार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार शुक्रवारी आणि शनिवारी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्ताने कल्याण दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने ते राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्या गाठीभेटी घेत पक्षाची आगामी रणनीती मांडणार आहेत.
आज रोहित पवार यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह कल्याणकडे न जाता लोकलने प्रवास करत सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांचे अनुभव ऐकून घेतले. लोकलमधील रोजची गर्दी, लोकलच्या तांत्रिक कारणाने वारंवार येणारे अडथळे आणि त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा रोजचा वेळखाऊ प्रवास, असे अनेक अनुभव त्यांनी यानिमित्ताने ऐकून घेतले.
हे सर्व मुंबई लोकल प्रवाशांचे अनुभव पाहता मुंबईतील नागरिकांना करोडो रुपये खर्च करून केवळ काही प्रवाशांसाठी होणारी पंतप्रधान मोदींची बुलेट ट्रेन खरोखर गरजेची आहे की, रोज लाखो प्रवाशांची लाइफलाइन असलेली मुंबई लोकलमधील अपेक्षित आणि गरजेची सुधारणा हवी, हा विषय महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
लोकल ही मुंबईची ओळख आहे. त्यात आज मितीला करोडोंचे उत्पन्न मिळत असताना त्या बदल्यात प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा कमी आणि अडचणी जास्त आहेत. त्यामुळे मुंबईकरांची खरी गरज बुलेट ट्रेन नसून लोकलच्या सुविधांची आहे, असे मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.