Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातव्यांदा बारामतीतून आमदार झाले आहेत. ते सतत चढत्या मताधिक्क्यांनी निवडून आलेले आहेत. अजितदादांना बारामतीकरांचा मोठा पाठिंबा आहे. त्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालेले योगदान हे खूप मोठे राहिले आहे. खरं म्हणजे सुप्रिया सुळे या भाग्यवान आहेत की, त्यांना अजित पवार यांच्यासारखा भाऊ मिळाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Supriya Sule is lucky, she got a brother like Ajitdada; Answer by Sunil Tatkare)
महिला आरक्षणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘प्रत्येक घरात बहिणीचं कल्याण पाहणारा भाऊ नसतो’ असे विधान केले होते. त्याला खासदार तटकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे या संसदेत अत्यंत प्रभावीपणे काम करतात. आम्हीही करतो. पण त्यांच्याइतकी तुलनात्मकदृष्ट्या राहू शकत नाही. आम्ही ज्यावेळी संसदेत निवडून जात असतो, त्यावेळी कुणाच्या तरी पाठबळावर निवडून जात असतो. त्यामुळे मला असं वाटतंय की सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांच्याबाबत बोलण्याचा हेतू नसावा.
आमच्यावर आतापर्यंत जे राजकीय संस्कार झाले, त्या सर्वांचा आम्ही आदराने उल्लेख करत आलेलो आहोत. सुप्रिया सुळे यांनी २००९ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या २००९, २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकीत अजित पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे, असे सुप्रिया सुळे सतत बोलत आलेल्या आहेत. मला वाटत नाही की, त्या अजित पवारांबद्दल बोलल्या असतील. कारण त्या अनेकदा अजितदादांबद्दल भावुक होत असतात, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
जुन्या संसदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बॅंकेच्या गैरव्यवहाराचा उल्लेख करण्यात आला होता. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी आपल्या भाषणात केली होती. या आरोपासंदर्भात सर्व यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली आहे. न्यायालयातही याचिका दाखल झाल्या. मात्र, त्यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही. शिखर बॅंकेबाबतही चौकशी झाली. आता ही बॅंक नफ्यात आला आहे, असेही तटकरे यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, हे खरं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात भाष्य केले होते. पण आम्ही २०१४ मध्ये न मागता भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर २०१७ आणि २०१९ चा घटनाक्रम सगळ्यांसमोर आहे. त्यानंतर पंतप्रधानांना बारामतीत बोलाविण्यात आले होते.
जुन्या संसदेतील तो शेवटचा दिवस होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेला उल्लेख हा अनुचित होता, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय घेतला आहे. त्यातून नैराश्य आल्याचे पाहायला मिळत आहे, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
‘आम्हीही काही आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केल्या’
आमदार जयंत पाटील यांच्याकडून विधान परिषद आणि विधानसभा सदस्यांच्या विरोधात काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडूनही काही आमदारांच्या विरोधात विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापती यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.