Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिका बदलण्यावर टीका केली आहे.
'आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय, तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मीळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्या वतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो,' असा टोमणा काळेंनी लगावला आहे. काळेंनी ठाकरेंनी पत्र लिहित टोला लगावला आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे.
विरोधी विचारधारेसोबत जाऊन सेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून दिले. सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात, मात्र आपणच झालात. याला यू टर्न, तडजोड, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे म्हणता येणार नाही, असे काळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रिपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपबरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णतः विरोधी विचारधारा असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच.
हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात, पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात. हे सगळे आपण केलेत यास कुठेही यू टर्न, तडजोडीचे, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही. याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे...!
आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मीळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्या वतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूर यांचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी, ही नम्र विनंती...!!!
'निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करूच ...'अशीच टीप त्यांनी लिहिली आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.