पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे राज्यात सत्तांतर घडलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यावर शिंदे यांच्या बंडखोर गटाला भाजपने समर्थन केले आणि राज्यात शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नवं सरकार स्थापन केलं आहे. यानंतर त्यांनी महाविकासा आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून पहिल्यांदाच मुंबईत धुमधडाक्यात आणि मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरी करण्यात येत आहे. यामाध्यमांतून मतदारांना आकर्षीत करण्याची खेळी केली जात असल्याच बोललं जात आहे.
मात्र यामाध्यमातून या उत्सवासाठी ओळखले जाणारे मनसे आणि शिवसेनेवर कुरघोडी केली जात असून भाजप आणि शिंदे गटाकडून आणि या उत्सवाचे श्रेय घेतले जात आहे. यावरून मनसेकडून प्रतिक्रिया आली असून मनसेचे एकमेव असलेले आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आज दहीहंडीच्या श्रेयासाठी कॅमेऱ्यासमोर मोठ्या बाता मारणाऱ्यांसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
राज्यात आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधांविना दहीहंडीचा सण साजरा होत आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील जांभोरी मैदानानंतर मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी फडणवीसांनी गोविंदांना संबोधित केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील (Tembhinaka) दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली आणि यावेळी त्यांनीही गोविंदांशी संवाद साधला. पाऊस सुरू होतोय आणि बघा आपलं सरकार आलं तर काय होतं? आपलं सरकार आले तर दहीहंडी जोरदार, गणेशोत्सव जोरदार, नवरात्री जोरात होत आहे, असे शिंदे म्हणाले तर तसेच आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही आता गोविंदा राहिलेले नाही, तुम्ही आता खेळाडू झालेले आहेत. आपलं सरकार आलं आणि दहीहंडी देखील जोरदार होते, आता कसं वाटतंय? मोकळं मोकळं वाटतंय ना?, असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
दरम्यान, दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात, अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. यामध्ये दहीहंडीमधील गोविंदांना खेळाडूंचा दर्जा तसेच, त्यांना खेळाडूंना लागू होणाऱ्या सगळ्या सुविधा लागू होणार असून राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांनाही मिळणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून शिंदे गट आणि भाजप दहीहंडीचे सर्रास श्रेय घेतांना दिसत आहेत. यावर मात्र मनसे आमदार राजू पाटलांनी टीका केली आहे. या उत्सवावरील निर्बंध हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी मागच्या काळाच पाठपुरावा केला आणि त्यासाबद्दलची स्पष्ट केलेली भूमिकेचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
राजू पाटील आपल्या ट्विटरमध्ये म्हणाले की, "मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी मनसे ! आपल्या दहिहंडीच्या परंपरेवर नियमांचं सावट होतं तेव्हा त्याविरोधात आवाज उठवला व थेट न्यायालयाला जाब विचारण्याची हिंमत दाखवली ती मा. राजसाहेबांनीच! म्हणूनच आज दहीहंडीच्या निमित्ताने कॅमेऱ्यासमोर श्रेयासाठी मोठ्या बाता मारणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ," अशा शब्दात पाटलांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.