Mumbai Manhole Death: मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? मॅनहोलने आतापर्यंत किती मुंबईकरांचा जीव घेतला?

Mumbai Manhole Accident News: मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीएमसीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
Mumbai Rain Incident | Ritu Tawde | Manhole Probe
Mumbai Rain Incident | Ritu Tawde | Manhole ProbeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Manhole Death: मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत पुन्हा एकदा उघड्या मॅनहोलमुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे 55 वर्षीय अस्लम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिका आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, “मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच दरम्यान अस्लम शेख यांचा तोल जाऊन ते सुमारे 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडले. स्थानिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. वारंवार अशा घटना घडत असताना प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ही घटना मुंबईसाठी नवी नाही. 29 ऑगस्ट 2017 रोजी प्रभादेवी-एल्फिन्स्टन रोड परिसरात मुसळधार पावसादरम्यान अशीच एक धक्कादायक दुर्घटना घडली होती. साचलेल्या पाण्यातून जात असताना एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये वाहून गेली होती. दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह वरळी येथे सापडला होता. त्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.

त्या प्रकरणाच्या तपासात काही स्थानिकांनी पाणी लवकर वाहून जावे म्हणून मॅनहोलचे झाकण उघडल्याचे समोर आले होते. पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. बीएमसीच्या चौकशी अहवालात कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अशा दुर्घटना थांबलेल्या नाहीत.

Mumbai Rain Incident | Ritu Tawde | Manhole Probe
Agriculture News: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौणखनिजावर रॉयल्टी माफ; नवा सरकारी नियम वाचा

साम टीव्हीने पहिल्याच पावसात मुंबईतील उघड्या मॅनहोलचे धोकादायक वास्तव समोर आणत प्रशासनाला इशारा दिला होता. तरीही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. आतापर्यंत उघड्या मॅनहोलमुळे मुंबईत पाच जणांचा बळी गेल्याचा दावा केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पावसाळ्यात मॅनहोल उघडे ठेवू नयेत, असे आवाहन केले आहे. पूरप्रवण भागांतील अनेक मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच उघडे मॅनहोल आढळल्यास नागरिकांनी तातडीने बीएमसीला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व अतिरिक्त आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे. महापालिका मुख्यालयात सुरू असलेल्या या बैठकीत साकीनाका येथील दुर्घटनेचा सखोल आढावा घेतला जात आहे.

घटना नेमकी कशी घडली, त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, मॅनहोल उघडा का होता, संबंधित विभागांनी आवश्यक खबरदारी घेतली होती का आणि या घटनेसाठी जबाबदार कोण, याबाबत माहिती घेतली जात आहे. संबंधित विभागांकडून अहवाल मागवण्यात आला असून, निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

यासोबतच मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा, पाणी साचलेल्या ठिकाणांचा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही बैठकीत आढावा घेतला जात आहे. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांचे जीव जात असतील, तर प्रशासन खऱ्या अर्थाने जागे कधी होणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत.

मुंबईत वारंवार घडणाऱ्या या दुर्घटना प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षाव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न अधोरेखित करत आहेत. प्रत्येक पावसाळ्यानंतर उपाययोजनांच्या घोषणा होतात, मात्र प्रत्यक्षात उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना थांबत नसल्याचे चित्र आहे.

Mumbai Rain Incident | Ritu Tawde | Manhole Probe
Pavana Pipeline Project: गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता; 15 वर्षांनंतरही मावळचे शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत, फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या घटना

मुंबईत पावसाळा सुरू झाला की उघडे मॅनहोल नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे वारंवार समोर आले आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांच्या घोषणा केल्या जात असल्या तरी दरवर्षी अशा दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या काही वर्षांतील काही धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

2 जुलै 2026 – साकीनाका (खैरानी रोड)

साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे मुसळधार पावसादरम्यान एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडली. घटनेनंतर अग्निशमन दलाने मोठी शोधमोहीम राबवली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.

सप्टेंबर 2024 – अंधेरी

अंधेरी परिसरात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच दरम्यान 45 वर्षीय विमल गायकवाड यांना उघडा मॅनहोल न दिसल्याने त्या त्यात पडल्या. स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले होते.

जून 2023 – गोवंडी

गोवंडी येथे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तपासणी सुरू असताना बीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी रामकृष्ण दास आणि सुधीर दास हे दोघे मॅनहोलमध्ये पडून बुडाले. या दुर्घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात कंत्राटदारासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.

ऑक्टोबर 2020 – घाटकोपर (असल्फा)

घाटकोपरमधील असल्फा परिसरात मुसळधार पावसादरम्यान शीतल भानुशाली यांना पाण्याखालील उघडा मॅनहोल दिसला नाही. त्या त्यात पडून वाहून गेल्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वरळी किनाऱ्याजवळ सापडला होता. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com