Narayan Rane: ...तर उद्धव ठाकरेंचा आवाज बंद होईल..! राणेंनी शिंदेंना पुढं करत वर्मावरच घाव घातला; संजय राऊतांनाही झापलं

Mahayuti Vs ShivsenaUBT: मुंबईत दरवर्षी पाऊस पडतो, जुलै-ऑगस्ट महिन्यांत अधिकच पाऊस पडतो.पण सरकारला मदत करायची सोडून आदित्य ठाकरे टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंना नावं ठेवताहेत. आम्ही जर तुम्हाला नावं ठेवली तर? असा सवालही राणेंनी यावेळी केला.
Narayan Rane Uddhav Thackeray
Narayan Rane Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यभरात अतिमुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यातच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची या धो धो कोसळणार्‍या पावसानं अक्षरश: दाणादाण उडवली. त्यात रेल्वेचे ट्रॅकसह भुयारी मेट्रोतही पाणी शिरले. हिंदमाता सर्कल, दादरसह अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबल्याचंही दिसून आलं. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर विशेषत: भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले. याच आरोपांना आता भाजप खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पावसामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. याचदरम्यान,भाजपची बुलंद तोफ व खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी (ता.27) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंच्याही टीकेवर कडक पलटवार केला.

नारायण राणे म्हणाले, मुंबईत दरवर्षी पाऊस पडतो,जुलै-ऑगस्ट महिन्यांत अधिकच पाऊस पडतो.पण सरकारला मदत करायची सोडून आदित्य ठाकरे टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंना नावं ठेवताहेत. आम्ही जर तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरे यांना धड मराठी बोलता येत नाही. तोतरा बोलत असतो. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? आरशात तुमचे चेहरे बघा असा घणाघात राणेंनी यावेळी केला.

कोकणात पाऊस पडतो तसाच समुद्राला मिळतो.अर्ध्या तासात जातो असे स्पष्ट करतानाच त्यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या उद्धव ठाकरेंवरही नारायण राणे यांनी टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये.माझ्याकडे 1985 पासूनचे हिशोब आहेत. बिचारे,शिंदे गप्प बसतात. एकनाथ शिंदेंनी मातोश्रीपर्यंत पोहोचवलेलं पोतं बाहेर काढावं म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे आवाज बंद होईल, असंही त्यांनी म्हटलं.

राणे पुढे म्हणाले,मिठी नदी प्रकरणात केतन कदम अटकेत आहेत.तसेच डिनो मोरियाचे कदमशी काय संबंध आहेत.मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत,असे संदर्भ जोडत ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.

याचदरम्यान, नारायण राणेंनी एकनाथ शिंदे हे निष्ठावान होते म्हणून त्यांनी काम केलं. ठाकरेंच्या परदेशातील गुंतवणुकीशी संबंधित माहिती आपल्याकडे येत असल्याचंही राणेंनी यावेळी सांगितलं. त्यांची इथं नव्हे,तर बाहेर गुंतवणूक असल्याचा आरोप केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये असा हल्लाबोलही खासदार राणेंनी यावेळी केला.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुंबईतील पावसानंतर मोदी-शहांनी दहा वर्षे काय केलं असा सवाल उपस्थित केला होता. यावर नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंसह राऊतांनाही अमित शहांचं नाव घेऊ नका. अडचणीत याल असा इशारा दिला आहे.

तसेच संजय राऊतांच्या नादाला लागू नका,ते काय महात्मा आहेत का? असा टोलाही लगावला. ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते, पुस्तक काढलं, जणू काही मोठ्या संग्रामात जाऊन आले, त्यांचं काय कौतुक? राऊत जेलमध्ये का गेले ते पाटणकर बाईंना विचारा, असा राणे स्टाईल खोचक टोला लगावत यावेळी नारायण राणेंनी राऊतांना झापलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com