
Mumbai News : केंद्रातील सत्तेची व नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी बहुमतापेक्षा जास्त म्हणजे सव्वातीनशे जागा २०२४ च्या लोकसभेला जिंकण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आपली सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशच्या (यूपी) जोडीने महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
केंद्रातील सत्तेची वाट ही सर्वाधिक खासदार निवडून येणाऱ्या यूपी तसेच महाराष्ट्रातून जाते. त्यामुळे ही दोन राज्ये आगामी लोकसभेसाठी भाजपच्या रडारवर आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासह जिंकण्याचे त्यांची लक्ष यावेळी ठेवले आहे. गेल्यावेळी २०१९ ला युतीचे ४१ खासदार निवडून आले होते. त्यात भाजपचे २३, तर शिवसेनेचे १८ होते. यावेळी युतीत राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा तिसरा पक्ष आल्याने चार जागा आणखी जास्त निवडून आणण्याचे लक्ष भाजपने ठेवले आहे.
केंद्रात सत्तेची हॅटट्रिक करण्यासाठी भाजप आणि त्यातही मोदी-शाह यांनी महाराष्ट्र आपल्या रडारवर ठेवला आहे. विरोधी पक्षाचा खासदार असलेल्या मतदारसंघांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रभारी, प्रचारप्रमुख नेमले आहेत. संभाव्य उमेदवारांना आतापासून तयारीला लागण्यास सांगितले आहे. मुंबईनंतर त्यांनी पुणे जिल्ह्यावर खास लक्ष दिले आहे.
शरद पवारांचे होम टाऊन आणि बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात पाय रोवण्यास अगोदरच भाजपने सुरवात केली आहे. त्यासाठी मोदी-शाह यांचे चार दिवसांच्या फरकाने पुण्यात दोन दौरे झाले. त्यात मोदी यांनी विकासकामांची उद्घाटने आणि भूमीपूजने करीत लोकसभा निवडणुकीच्या अप्रत्यक्ष प्रचाराचा नारळही फोडला.हे दोघे पुन्हा जिल्हा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यातून तेथे आपले पाय अधिक घट्ट रोवून पवारांना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो सफल होतो का ? हे दहा महिन्यातच कळणार आहे.
Edited by : Rashmi Mane