Mumbai Political News : आता राजकारणात मन रमत नाही, असे म्हणत माजी खासदार नीलेश राणे यांनी मंगळवारी (दि. २४) राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. राणे यांनी ट्विट करत सक्रिय राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर आज (दि. २५) सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नीलेश राणेंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. इतकेच नव्हे तर, चव्हाण आणि राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर तासभर चर्चा झाल्यानंतर नीलेश राणे आपला निर्णय मागे घेणार असल्याची चर्चा कुडाळच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान, रवींद्र चव्हाण हे माध्यमांशी बोलत असताना नीलेश राणे हे जवळच उभे होते. परंतु, त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलणे टाळले. ते कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता निघून गेले.
देवेंद्र फडवीसांची भेट घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले, '' नीलेश राणेंनी ट्विट केल्यानंतर आमच्यासारख्या प्रत्येकाला काय घडले हे माहीत नव्हते. आज सकाळी नीलेश राणेंशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीसही या विषयावर बोलले, काहीतरी घडले होते म्हणून हे सर्व होत आहे. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होऊ नये, अशी नीलेश राणेंची इच्छा होती. या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. या गोष्टींचा आम्ही गांभीर्याने विचार केला.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार करत असतो. प्रत्येकाच्या भावना असतात. त्या भावना आम्ही जाणून न घेतल्यामुळे नीलेश राणे नाराज होते. त्यामुळे त्यांनी नाराजीतून हा निर्णय घेतला होता. पण आता आम्ही यात लक्ष घातले. चांगला कार्यकर्ता संघटनेतून बाहेर जाऊ नये, ते पक्ष संघटनेलाही परवडणारे नाही. या दिशेने आम्ही चर्चा केली. यापुढे नीलेश राणे यांच्या नेतृत्वात कोकणातील सर्व भागात आगामी निवडणुकांचा झंझावात सुरू राहील. आम्ही सर्वजण पक्षसंघटनेत काम करत असतो.
नीलेश राणेंची नाराजी स्वाभाविक होती, पण यापुढे असे काही घडणार नाही, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुका असोत. ग्रामपंचायत निवडणूक असो वा लोकसभेची छोट्या-छोट्या कार्यकर्त्याचीही नाराजी दूर होईल, याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन चव्हाण यांनी नीलेश राणेंना दिले.
दुसरीकडे, निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत कलह नको, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा, अशा आदेश खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नीलेश राणे आणि चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.