
Nagpur News : इको फ्रेंडली होळी, दिवाळी होऊ शकते तर ईद का नाही असा सवाल उपस्थित करून राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री राणे यांनी आपण आपल्या मतावर ठाम असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे त्यांना राज्य अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने अध्यक्ष प्यारे खान यांनी नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला होता.
दुसरीकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व धर्मांना त्यांच्या रितीरिवाजानुसार सणवार साजरे करण्याचा अधिकार आहे आणि भाजपही त्यासाठी आग्रही असल्याचे सांगून राणे यांच्या मतांशी असहमती दर्शवली होती. यानंतर नितेश राणे Nitesh Rane मवाळ होतील, आपली भूमिका बदलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांना आता प्यारे खान आणि मुस्लिमांना मी दिलेला सल्ला चांगला आहे. यामुळे हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रश्न येत नसल्याचे म्हटले आहे.
प्यारे खान यांनी नोटीस बजावणार असल्याच्या प्रश्नावर राणे म्हणाले, एका जबाबदार व्यक्ती तेवढ्याच जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली पाहिजे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता, त्यांचे प्रबोधन कसे करू शकता हे काम प्राधान्याने केले पाहिजे. सध्या प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे.
जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी(Muslim) करावा. अशी माझी भूमिका व सल्ला आहे.
जसे हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचा ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही तर मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद केली तर काही बिघडत नाही. उलट ते त्यांच्या फायद्याचेच आहे. बकरी ईद मुळे हिंदू नागरिक अस्वस्थ आहेत. कारण त्यांच्या सोसायटीमध्ये बकरे कापले जाणार असल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.
दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. उद्या यामुळे दंगली पण होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी जर कोणी सल्ले देत असेल तर ऐकले पाहिजे. हिंदू समाजाला सल्ले दिले जाते, तेव्हा हिंदू समाज आक्रोश करतो का? जोरजबरदस्ती करतो का? मग अबू आझमी कसे बोलतो, हम तो बकरा काटेंगे असा सवालही त्यांनी केला.
त्यामुळे कोण इस्लामला बदनाम करत आहे आणि कोण फडणवीस यांची बदनामी करत आहे हे महाराष्ट्राला कळतय. प्यारे खान यांना मी सल्ला देतो त्यांनी मी काय बोललो याबद्दल विचार करावा आणि त्यांनीच मुस्लिम समाजाला आवाहन करायला पाहिजे की नितेश राणे जे बोलत आहे ते आपल्या हिताचे आहे.
आम्ही असताना दंगली होण्याचा कारण नाही. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर इको फ्रेंडली बकरी ईद हाच चांगला पर्याय असल्याचेही राणे यांनी सांगितले. मला नोटीस देण्याचा इशारा देणारे प्यारे खान टीव्हीवर बोलतात. माझ्यासमोर येतात तेव्हा हात जोडून उभे राहतात, असे सांगून त्यांनी आपण कोणाला घाबरत नाही असेही अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.