Ulhasnagar News: राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाने उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामधून ओमी कलानी यांना उमदेवारी जाहीर केली आहे. याआधी कलानी कुटुंबातून ओमी कलानी यांचे वडील पप्पू कलानी यांनी चार वेळा, तर दिवंगत ज्योती कलानी यांनी एकदा आमदार पद भूषवलेले आहे. यावेळेस ओमी कलानी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जर यश मिळवले तर ते कलानी कुटुंबातील तिसरे आमदार ठरतील.
विशेष म्हणजे ओमी कलानी(Omi Kalani ) विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यासाठी खास गोव्यामध्ये बैठक पार पडली होती. तर उल्हासनगर विधानसभेत प्रथमच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत अपेक्षित आहे.
पप्पू कलानी यांनी 1986 मध्ये नगराध्यक्ष पदावरुन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी 1990 पासून 2009 पर्यंत सलग चार विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांची पत्नी दिवंगत ज्योती कलानी यांनी देखील 2014 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. अनेक वर्षं कलानी कुटुंबाने आमदारपद राखलं आहे. आता ओमी कलानी यांच्या रूपाने पुन्हा एकदा कलानी कुटुंबातून तिसरा आमदार होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत उल्हासनगर विधानसभा 141 क्षेत्रात 18 उमेदवार निवडणूक लढले होते.यात भाजपचे कुमार आयलानी 43,577 मतांसह विजयी झाले होते,तर राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी या 41,631 मतं मिळवून दुसऱ्या स्थानावर होत्या. कुमार आयलानी यांनी केवळ 2004 मतांनी विजय मिळवला होता. हा विजय शिवसेना-भाजप युतीमुळे झाल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. पण यंदा शिवसेना(Shivsena) दोन गटात विभागली गेल्याने परिस्थिती वेगळी आहे.
भाजपचे(BJP) कुमार आयलानी यांनी 2009 आणि 2019 असे दोनदा आमदारकीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते.
याच कारणास्तव पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून रामदास आठवले यांनी भालेराव यांना पक्षातून काढून टाकलेले आहे.त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवायचीच या जिद्दीने भगवान भालेराव यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. भगवान भालेराव हे देखील 2019 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना 8122 मते पडली होती. आता त्यांना मनसेचा बॅनर मिळाला आहे.
तसेच दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्ता यांचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी बिनसल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकला असून ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच चौरंगी लढत होत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.