नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा विजय म्हणजे भाजपच्या (BJP) यापुढील विजयाची नांदी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या विजयावेळी झालेल्या आनंदापेक्षा जास्त आनंद आज झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली. भाजपने काँग्रेसची मतं फोडत अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळवली. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. ऐनवेळी उमेदवार बदलल्याने मोठी नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
या दणदणीत विजयावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, मला माझ्या विजयावेळी झालेल्या आनंदापेक्षा जास्त आनंद आज झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आजचा विजय म्हणजे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची नांदी आहे. बावनकुळे यांचा हा नेव्हर गो बॅक वाला कम बॅक आहे. तीन पक्ष एकत्र आल्यावर आपल्याला कुणी पराभूत करू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नागपूरमध्ये पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. नाना पटोले यांनी मतदानाच्या आदल्या रात्री उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा घोषित केला. त्यामुळे काँग्रेससह महाविकस आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार सदस्य संभ्रमित झाले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
भोयर यांनी या पराभवानंतर भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. तसेच नाना पटोले यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. पण ऐनवेळी उमेदवार बदलावा लागण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवल्यानेच हा पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अकोल्यातही महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे. 400 हून अधिक मतं असलेल्या आघाडीच्या उमेदवाराला 334 एवढीच मतं मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.