ips officer Parambir singh and home minister Anil Deshmukh
ips officer Parambir singh and home minister Anil DeshmukhSARKARNAMA

देशमुखांची 100 कोटीची वसुली : परमबीरसिंगांचा आरोप ठरणार फुसका बार?

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र आले पुढे

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कोठडीत गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यासाठी दिलासा देणारी घटना घडली आहे. ज्या प्रकरणामुळे त्यांना आपले पद सोडावे लागले आणि ईडीचा ससेमिराही मागे लागला त्या 100 कोटी वसुलीच्या प्रकरणाला `यू टर्न` मिळाला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुखांवर आरोप करत सचिन वाझेला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्या परमबीरसिंग यांनी आता आपले म्हणणे अप्रत्यक्षरित्या मागे घेतले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करताना परमबीरसिंग यांनी आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे. आयोगासमोर झालेल्या सुनावणीत परमबीरसिंग यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती त्यांच्या वकिलाने बुधवारी दिली.

ips officer Parambir singh and home minister Anil Deshmukh
ED चा दिवाळीतच धमाका : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

या वकिलाला त्यांनी पाॅवर ऑफ अॅटर्नी दिली आहे. त्यानेच ही माहिती वृत्तवाहिन्यांना दिली. निवृत्त न्यायाधीश कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगासमोर ही सुनावणी सुरू आहे. आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करूनही, ते आतापर्यंत हजर झालेले नाही. आयोगाने परमबीर सिंग यांना तीनदा दंड ठोठावला होता. जून महिन्यात ५ हजार आणि इतर दोनदा गैरहजर राहिल्याबद्दल प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला होता. आता थेट आयोगापुढे न येता त्यांनी या आरोपांबाबत आपल्याकडे मुख्यमंत्र्याना दिलेल्या त्या पत्राशिवाय कोणताच जादा पुरावा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ips officer Parambir singh and home minister Anil Deshmukh
मोठी बातमी : परमबीरसिंग यांचं गुजरात कनेक्शन...अल्पेश पटेल गजाआड

या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चौकशी आयोगासमोर हजेरी लावली. परमबीर सिंग यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे देण्यास नकार दिला आहे. तसेच सिंग उलट तपासणीसाठीही तयार नाही,” असे शिशिर हिरे यांनी सांगितले.

परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सचिन वाझे आणि मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्याकडे देशमुख यांनी ही मागणी केल्याचे म्हटले होते. रेस्टॉरंट आणि बारमालकांकडून पैसे गोळा करण्यास या दोन अधिकाऱ्यांना देशमुखांनी सांगितल्याचे परमबीरसिंग यांनी म्हटले होते. त्यातील वाझे हा सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात एनआयएने त्याला मुख्य आरोपी केले आहे.

ips officer Parambir singh and home minister Anil Deshmukh
`फडणविसांच्या घरी भांडी घासणारे` परमबीरसिंग हे ठाकरे यांचेही असे झाले लाडके!!

परमबीरसिंगांच्या आरोपानंतर देशमुख यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयने कारवाई सुरू केली. तसेच परमबीरसिंग यांच्याविरोधातही काही ठिकाण खंडणीचे आणि अॅट्रोसिटिचे गुन्हे दाखल झाले. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून होमगार्डमध्ये बदली झाल्यानंतर काही दिवसांनी सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात या खंडणीच्या आरोपांचा दावा केला होता. परमबीरसिंग सध्या कोणत्याच आरोपांना उत्तर देण्यासाठी न्यायालयासमोर आलेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com