Mumbai News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही मोठ्या प्रमाणात ढवळून निघत आहे. यातच आता राजकीय नेतेमंडळींकडून हेवे-दावे, आरोप-प्रत्यारोप यांनी एकमेकांवर डिवचण्याचंही काम जोरात सुरू आहे.
महाविकास आघाडी असो वा महायुती दोन्ही बाजूने आगामी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. अशातच आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे शुक्रवारी(ता.18) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसह राजकीय घडामोडींवरही थेट भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) 1988-91 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा म्हटलं आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले,1988-91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहिमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला.
1988-91 या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का ? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्यावेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५४ मध्ये सूचित केले होते की, चीन हे विस्तारवादी आहे. जर आपण आपली सुरक्षा करण्याच्या स्थितीत आलो नाही, तर चीन आपल्यावर हल्ला करू शकतो. बाबासाहेबांचे हे मत केंद्र सरकारने ऐकले नाही. त्याचा परिणाम आज आपल्या सर्वांना दिसत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. एकीकडे यूएस, कॅनडा आणि भारत यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे.
तर दुसरीकडे इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात वाढणार अशी शंकाही आंबेडकर यांनी व्यक्त केली. पॅलेस्टाईन आणि इस्राईलची भांडणे चालू आहेत. आपले केंद्र सरकार आतून इस्राईलसोबत आहे आणि बाहेरून पॅलेस्टाईनसोबत आहे, अशी परिस्थिती असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भारताची आजची परिस्थिती आहे, ती 1990-2000 सालासारखी दिसत आहे. मध्यंतरी बॉम्ब ब्लास्ट होत होता, कोणाला तरी गोळी मारली जायची ते काही दिवसांपासून पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी या वेळी म्हटले. बाबा सिद्दीकी यांची हत्या सुद्धा त्यामुळेच झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.