
Nishikant Dubey Questioned in Parliament : भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांविषयी केलेल्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर दिल्लीतही हा वाद पोहचला असून काँग्रेस तीन महिला खासदारांनी दुबेंना गाठत चांगलेच सुनावले आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या खासदारांचे कौतुक केले आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी दुबेंना मराठीवरून जाब विचारला होता. काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांकडून या तिन्ही खासदारांचे कौतुक सुरू असताना मनसेकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मनसेने सोशल मीडियात एक पोस्ट करत इतर खासदारांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहे.
मनसेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मराठी माणसांना आपटून आपटून मारेन... " अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदार वर्षाताई गायकवाड, प्रतिभाताई धानोरकर, शोभाताई बच्छाव यांनी आज संसदेत घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या बेताल विधानाचा जाब विचारला. यासाठी तिन्ही खासदार महोदयांचे मनापासून अभिनंदन.
पण महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का आहेत? मराठी माणसाचा अपमान या 45 खासदारांना सहन कसा होऊ शकतो? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का?, असे तीन प्रश्नही मनसेकडून सोशल मीडियात करण्यात आलेल्या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आले आहेत. प्रामुख्याने मराठी विजयी मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांकडे हा रोख असावा, अशी चर्चा आहे.
लोकसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांना खासदार दुबे लोकसभेच्या लॉबीमध्ये दिसले. लगेच या तिघींनी दुबेंना घेरले. मराठी माणसाला ‘पटक पटक के’ मारण्याची भाषा कशी करता. मराठी भाषिक तुमची अरेरावी सहन करणार नाहीत, असे या तिन्ही खासदारांनी दुबेंना सुनावले. वर्षा गायकवाड यांनी 'जय महाराष्ट्र'ची घोषणा देताच दुबेंनी सरळ हात जोडले आणि आप मेरी बहन हो, असे म्हणत तेथून पळ काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.