
Panvel News : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा पनवेलमध्ये पार पडला. या मेळाव्यासाठी शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना निमंत्रित केले होते. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजारी असतानाही सभा गाजवली.यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावरही जोरदार हल्ला चढवला.
'आज इथं मी जे आलोय,ते जयंतरावांवरच्या प्रेमाखातर आलो आहे. सकाळी माझ्यात ताकदच नव्हती. फार काही मोठं भाषण करणार नाही. पावसाळा झाला की,पनवेलमध्ये नक्की सभा देईन,असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शेकापच्या मेळाव्यात शनिवारी (ता.2 ऑगस्ट) बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्या असलेल्या राजकारणावर थेट भाष्यही करतानाच मराठीच्या मुद्द्यालाही हात घालत सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, काय झालंय, ते हल्ली डॉक्टर सांगत नाही. पूर्वीचे आजार कसं नाव घेऊन समोर यायचे, हल्ली तसे येतच नाही. हल्लीचे आजार आणि महाराष्टाचं राजकारण यात फारसं काही फरक नाही. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
ठाकरे म्हणाले, हा या पक्षातून त्या पक्षात गेला,तो त्या पक्षातून या पक्षात गेला. मग आपण म्हणतो काय झालं,मग तो म्हणतो व्हायरल होता. सध्या महाराष्ट्रात व्हायरल खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.स्वातंत्र्य मिळण्याअगोदर 12 ते 13 दिवस आधी ज्या पक्षाची स्थापना झाली,तो शेतकरी कामगार पक्ष आहे. 3 ऑगस्ट 1947 ला पक्षाची स्थापना झाली आणि 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्वकाळात निर्माण झालेला शेकाप हा एकमेव पक्ष आहे. इतक्या वर्षांपासून हे सर्व टिकून आहे, हे आश्चर्य आहे. मला अजूनही आठवतं, शिवसेनेच्या 1981 साली मुंबईतील पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. कम्युनिस्ट आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. पण त्यावेळी शिवसेनेच्या व्यासपीठावर डांगे आले होते. त्यावेळचे राजकारण आणि राजकीय नेते उदारमतवादी होते,मोठ्या मनाचे होते, ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागलं आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी यांनी यावेळी केली.
तसं पाहिलं तर त्यावेळी शिवसेनेच्या व्यासपीठावर श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या ध्वजासोबत लाल ध्वज येण्यासारखं आहे.आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज एकत्र आले आहेत, असंही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
ज्यावेळी मला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येऊन सांगितलं, फक्त मराठीच्या मुद्दयावर बोला, फक्त मराठीच्या मुद्द्यावर बोला,बाकी काही नको. त्याच्यामुळे मला खरं तर शेतकरी कामगार पक्षावर खूप काही बोलायचं होतं. पण आता तेच बोलले म्हटल्यामुळे, मी काही बोलणारच नाही,अशी फिरकीही राज ठाकरे यांनी जयंतरावांची घेतली.
यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करत आहे, बाहेरून येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही. मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग राज ठाकरे बोलतो तेव्हा संकुचित कसा? असं ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरुन घणाघात केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.