Mumbai News : विधानसभा निवडणूक जवळ येताच इनकमिंग अन् आऊटगोईंगला सर्वच राजकीय पक्षांमध्ये उधाण आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवारांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून बंडखोरांना पराभूत करण्यासाठी तगडे उमेदवार देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.
पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अजितदादांसोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे परत येत आहे. आता सिंदखेड राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनीदेखील आता शुक्रवारी (ता.19) 'तुतारी' हाती घेतली आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी मोठं विधान केलं आहे.
गेल्यावर्षी अजितदादा पवार यांनी काही दिग्गज नेते आणि 40 ते 42 आमदारांना सोबत घेत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येसह आमदारांनी साथ सोडणे हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत वारे फिरल्यापासून पण अजितदादांच्या पक्षातील नेते पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या तयारीत आहे.
अजितदादा पवार यांना धक्क्यावर धक्के देत शरद पवारांकडून (Sharad Pawar) एक-एक आमदार फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच काका राजेंद्र शिंगणे यांच्याविरुद्ध पुतणी गायत्री शिंगणे राष्ट्रवादी धानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. पण आता शिंगणे पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
आमदार राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेतली आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी या पक्षप्रवेशामागची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील हे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते.
शिंगणे म्हणाले, 1992-93 पासून शरद पवारसाहेबांबरोबर काम करत आलो आहे. 1995 मध्ये देखील अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने अनेकवर्ष साहेबांबरोबर काम केले.राजकारण-समाजकारणात पवारसाहेबांमुळेच मोठं होण्याची संधी प्राप्त झाली असं त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितलं.
जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवारांबरोबर होतो हे वेळोवेळी सांगितलेलं आहे. मला जर राज्य सरकारकडून मदत मला मिळाली नसती, तर बँक वाचवणं मला अवघड झालं असतं. त्याचमुळे आपल्याला अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. वर्षभर अजित दादांबरोबर होतो. जवळपास वर्षभर आपण त्यांच्यासोबत होतो.पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वाचवण्याची गरज असल्याची स्पष्ट भूमिकाही आमदार शिंगणे यांनी यावेळी मांडली.
महाराष्ट्राला राजकीय-सामाजिक दृष्ट्या तसेच अनेक इतर विषयांच्या दृष्टिकोनातून वाचवण्याची गरज आहे. आणि हे काम शरद पवारसाहेबच हे काम करू शकतात यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, असंही राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर म्हटलं आहे.
मला कोणत्याही प्रकारचा आश्वासन दिलं नव्हतं, मी स्वतःहून त्या पक्षातून बाहेर पडलो होतो. पक्षसंघटना वाढवण्यासाठी नेतृत्व जे काही काम देईल, ते मी करेन असेही शिंगणे यांनी सांगितले. आज मी माझ्या पक्षात परत आलो आहे, पक्षप्रवेश केलेला नाही असेही शिंगणे म्हणाले.
पक्ष आणि नेतृत्व जे काही सिंदखेड राजा मतदारसंघात जी जबाबदारी देण्यात येईल ती मी स्वीकारणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.