Ramdas Kadam : फडणवीससाहेब, तुमचा मंत्री माझ्या मुलाचं करिअर संपवतोय? रामदास कदमांची कोणाविषयी तक्रार

Ramdas Kadam On Bjp : रामदास कदमांनी थेट भाजपच्या मंत्र्यावर आरोप केल्यानं महायुतीत ठिगणी पडण्याची शक्यता आहे.
ramdas kadam devendra fadnavis yogesh kadam
ramdas kadam devendra fadnavis yogesh kadamsarkarnama

माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी अलीकडेच 'मी कोकणातून शिवसेना संपवली' असं विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर राणेंवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'प्रहार' करण्यात येत होते. यातच शिंदेंच्या शिवसेनेतील नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) हे आमदार योगेश कदम यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कदमांच्या वक्तव्यानंतर महायुतीत फटाके फुटण्याची शक्यता आहे. ते एका यूट्यूब चॅनेलशी संवाद साधत होते.

रामदास कदम ( Ramdas Kadam ) म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. भाजप मित्रपक्षांना कसं संपवत आहे, त्याचं जिवंत उदाहरण माझ्या मुलाचं आहे. जो अन्याय उद्धव ठाकरेंनी केला, तोच रवींद्र चव्हाण करत आहेत."

"रवींद्र चव्हाण स्थानिक दापोलीतील विधानपरिषदेच्या आमदारांच्या नावानं अर्थसंकल्पात कामे घेतात. स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून त्यांची भूमिपूजन करण्यासाठी ठाण्यातील आमदार संजय केळकर यांना दापोलीत पाठवण्यातात. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून, अशी भूमिपूजन करता येत नाही. हा हक्कभंग होतो," असं रामदास कदमांनी सांगितलं.

"दापोलीत भूमिपूजनाचे बॅनर लावण्यात आले. आता हे बॅनर लावले त्याला फोडा आणि भूमिपूजन करण्यासाठी येणाऱ्यांना झोडा, अशी भूमिका मी घेतली. हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा कुणीही भूमिपूजनासाठी आलं नाही," असं कदमांनी म्हटलं.

"ही गोष्ट मी देवेंद्र फडणवीसांच्या ( Devendra Fadnavis ) कानावर घातली होती. त्यांनी हे थांबवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं दाखव, असं आहे," असंही कदमांनी सांगितलं.

"शिवसेनेनं निर्णय घेतला नसता, तर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाले असते का? याची जाणीव त्यांना पाहिजे होती. आमच्यावर अनेक आरोप झाले, तरीही आम्ही ते सहन केले. मंत्रिमंडळ आणि रवींद्र चव्हाण मंत्री झाले. आता तेच आमच्या मुळावर उठले आहेत," अशी संतप्त प्रतिक्रिया रामदास कदमांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com