Kalyan News: कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे शहर अध्यक्ष वरूण पाटील यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली असून नरेंद्र पवार यांनी माघार घेतली आहे. तसेच कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली असून काँग्रेसचे सचिन पोटे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे महायुतीला आगामी निवडणुकीत मतविभाजनाचा मोठा फटका बसू शकतो.
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कल्याण पश्चिम मधून भाजपचे(BJP) माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज भरला होता. सोमवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता कल्याण पश्चिम विधानसभेत महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे, मनसेचे उमेदवार उल्हास भोईर आणि भाजपा (BJP) बंडखोर वरूण पाटील यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ होती. त्यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील हे दोघेही काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी (NCP) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्याविरोधात भाजपचे कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दंड थोपटत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
हे अर्ज मागे घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडून पवार आणि पाटील या दोघांच्याही मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. या मनधरणीला काही प्रमाणातच यश आले आणि नरेंद्र पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला तर वरुण पाटील यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणे पसंत केले आहे. परिणामी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे सचिन बासरे. मनसेचे उल्हास भोईर आणि भाजपा बंडखोर वरूण पाटील यांच्यात खरी लढत पाहायला मिळणार आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 30 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे सादर केले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अरविंद मोरे, मोनिका पानवे, नरेंद्र मोरे, राजकुमार पातकर, अश्विनी मोकासे आणि नरेंद्र पवार या 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
भाजपच्या सुलभा गायकवाड , शिंदे गट बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय बोडारे , वंचितकडून विशाल पावशे यांच्यात लढत होणार आहे. शिंदे गटाकडून महेश गायकवाड यांनी बंडखोरी केल्याने महायुतीचे उमेदवार शिल्पा गायकवाड यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहून त्यांची टेन्शन वाढले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.