

Rohit Arya Mumbai case : शालेय शिक्षण विभागाने राबवलेली 'स्वच्छता मॉनिटर' संकल्पना गुंडाळल्यानंतर ज्याची संकल्पना होती, ज्यांनी हे कंत्राट घेतले त्या रोहित आर्याचे 45 लाख रुपये शालेय शिक्षण विभागाने दिला नसल्याचा आरोप केला. त्यातूनच मुंबई पवईत रोहितने 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ओलीस ठेवलं.
अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं अन् मुलांची सुटका केली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, त्यामध्ये आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. मुला-मुलींना ओलीस ठेवण्याचा प्रकार सुनियोजित कट होता, हे पोलिस तपासात समोर आलं आहे. चित्रपट लेखक, दिग्दर्शक रोहित आर्याने गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत शांत डोक्याने रोहित आर्या याची तयारी करत होता.
रोहित आर्याने वेब मालिकेसाठी लहान मुलांचे ऑडिशन, निवड झालेल्या मुलांसाठी अभिनय प्रशिक्षण वर्गासह मालिकेच्या चित्रीकरणाचा (Film) निव्वळ देखावा उभा केला होता. मालिकेची सुरूवात ओलीस नाट्याच्या प्रसंगाने होईल. त्या प्रसंगाचे चित्रीकरणही केले जाईल, असे त्याने लहान मुले, त्यांचे पालक आणि मालिकेच्या चित्रीकरणासाठी निवडलेल्या चमुला सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष ओलीस नाट्य आरंभले तेव्हा रंगीत तालीम सुरू असल्याचे उपस्थितांना वाटले.
पोलिस (Police) दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार ऑडिशन निव्वळ आभास असून आर्याच्या डोक्यातील नेमक्या कटाबद्दल गुरुवारी दुपारी दीडपर्यंत स्टुडिओमध्ये हजर एकाही व्यक्तीला पुसटशी कल्पना नव्हती. प्रत्यक्षात आर्या अशी कोणतीही वेब मालिका निर्माण करणार नव्हता. फक्त मालिका निर्मितीच्या निमित्ताने तो ओलीस नाट्याची गेले काही दिवस रंगीत तालीम करत होता. 30 ऑक्टोबरला त्याने तो कट प्रत्यक्षात आणला.
अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुळात आर्याने आजवर सामाजिक विषय घेऊन जनजागृतीपर साहित्य निर्मिती केली आहे. त्यामुळे तो चित्रपट सृष्टीत परिचित होता. राजकीय नेत्यांनीही त्याचे कौतुक केले होते. त्यामुळे त्याने दिलेल्या निमंत्रणावरून मराठी चित्रपट सृष्टीतील दोन नामांकित कलाकार ऑडिशन प्रक्रियेत सहभागी झाले होते. तर काही कलाकार घटना घडली त्यादिवशी तेथे जाणार होते.
स्वच्छता मॉनिटर प्रकल्प आणि सरकारच्या 'माझी शाळा स्वच्छ शाळा योजने'मुळे आर्याचा राज्यातील बहुतांश शाळांमध्ये परिचय होता. त्याने या शाळांकरवी विद्यार्थी व पालकांना 26 ऑक्टोबरला मुंबईत सुरू होणाऱ्या ऑडिशनची माहिती पोहोचवली. या ओडिशनला राज्यातून बरीच मुले सहभागी झाली होती. त्यातील 23 विद्यार्थ्यांची निवड केल्याचे भासवले. गुरूवारी यातील 17 मुले आरए स्टुडिओत हजर राहिली होती.
ओलीस नाट्य घडलेला स्टुडिओ रोहित आर्याने स्वतःच बुक केला होता. हा स्टुडिओ एक मजली(ड्यूप्लेक्स) होता. तळमजल्यावरील मोठ्या हॉलमध्ये चित्रीकरणाशी संबंधित अन्य मंडळी आणि विद्यार्थ्यांचे पालक होते. तर वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही मुले तर दुसऱ्या खोलीत काही मुलांना आर्याने बंदिस्त केले होते. दोन मजल्यांना जोडणारा एकच जिना होता. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सुमारे दोन ते अडीच इंच जाड काचेचा दरवाजा होता. तो बंद केल्यावर वरची मंडळी वर आणि खालची खालीच राहिली.
आर्याने 17 लहान मुलांसोबत दोन महिलांनाही ओलीस ठेवले होते. या ओलीस नाट्यात आर्याच्या हालचालींची नेमकी माहिती पुरवणारे रोहन अहेर तळमजल्यावर उपस्थित होते. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार आर्याने साधारण तीन महिन्यांपूर्वी संपर्क साधून वेब मालिकेच्या निर्मितीबाबत सांगितले होते. त्यानंतर अनेकदा बैठका झाल्या आणि 26 ऑक्टोबर पासून ऑडिशनने कामाला सुरूवात झाली. त्यांच्याप्रमाणे अन्य आवश्यक सहकाऱ्यांचीही निवड आर्याने आधीच केली होती.
ओलीस नाट्य घडलेल्या स्टुडिओत सीसीटीव्ही होते. मात्र आर्याने स्टुडिओच्या प्रत्येक मार्गावर अद्ययावत सीसीटीव्ही(मुव्हींग) आणि तसेच प्रत्येक दरवाजाला मोशन सेन्सर बसवून घेतले होते. इतकेच नव्हे त्याने स्टुडिओचे मुख्य प्रवेशद्वार वेल्डिंग करून कायमचे बंद केले. प्रत्येक खिडकीला कुलूप लावून घेतले. सीसीटीव्हींचे चित्रण तो मोबाइलद्वारे पाहत होता. त्यामुळे बाहेरील पोलिसांच्या हालचाली त्याला स्पष्ट दिसत होत्या. मात्र इमारतीच्या काचेच्या भिंतीआड काय सुरू आहे हे पोलिसांना किंवा अन्य कोणालाही दिसू नये यासाठी सर्वत्र काळे पडदे लावून घेतले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.