
Donald Trump’s Aadhaar: ₹20 That Exposed a Flaw : भारतात आधार कार्ड काढण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया आहे. काही आवश्यक पुरावे दिल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मिळू शकते. पण कोणत्या पुराव्याशिवाय, सरकारी यंत्रणेकडे न जाता हे आधार कार्ड मिळाले तर... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड काढून दाखविले आहे.
मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी मंगळवारी व बुधवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर रोहित पवार यांनी गुरूवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत बोगस आधार कार्ड आणि मतदारयाद्यांचे कनेक्शन जोडले आहे.
दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी हेराफेरी कशी होते, हे दाखविले. या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे सांगत रोहित पवार यांनी एका संकेतस्थळावर ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
एका संकेतस्थळावरून १२३४५६७८९०१२ या क्रमांकाचे आधार कार्ड काढण्यात आले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प तात्या हे नाव, फेटा घातलेला ट्रम्प यांचा फोटो, घर क्रमांक - ००७, गल्ली – पांढरा बंगला, गाव – राशीन, जन्मतारीख - १८२५, लिंग – स्त्री आदी अशी माहिती या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. त्यानंतर अर्ज फी ऑनलाईन २० रुपये भरल्यानंतर ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार झाले.
याच आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली जाते. अशाचप्रकारे बोगस आधार कार्ढच्या आधारे अधिकारी डोळेझाकपणे नोंदणी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. केवळ घरचा पत्ता बदलून तीनदा मतदारयादीत नावे आली. एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱया ठिकाणी पुरूष म्हणून नोंदणी करण्यात आल्याचे पुरावे रोहित पवारांनी दाखवले. मतदारयादीत असे अनेक घोळ असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे पदाधिकार देवांग दवे यांनी एक मेझडॉलजी तयार केली. निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करण्याची जबाबदारी दवे यांच्याकडे दिली गेली. आमच्याआधी दवेकडे सगळी माहित होती. काय घालायचे, डिलीट करायचे काम दवेंनी उमेदवारांना हाताशी धरून केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारवाढीचे विश्लेषण, क्रॉफ व्हेरिफिकेशन केले असल्यास त्याची माहिती, वाढलेल्या मतदारांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.