Mumbai : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथे असलेल्या 'बारामती ॲग्रो'च्या 'डिस्टलरी प्लांट'ला नोटीस बजावत पुढील 72 तासांत हा प्लांट बंद करावा, असे आदेश नोटिशीद्वारे दिले होते. या आदेशाला कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या 'बारामती ॲग्रो'च्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत प्रदूषण मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली होती.
न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे. पण तोपर्यंत 'बारामती ॲग्रो'च्या प्लांटवर कोणतीही कारवाई करू नये, असं हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. यावरून आता रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत इशारा दिला आहे.
'बारामती ॲग्रो'चे सीईओ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आभार मानताना सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल करणारे ट्विट केले आहे. बारामती ॲग्रोवरील कारवाईवरून पवार यांनी'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घर पर पत्थर नहीं फ़ेंका करते' अशा शब्दांत विरोधकांना इशारा दिला आहे.
रोहित पवार काय म्हणाले...?
इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील प्लांटवर प्रदूषण मंडळाने गुरुवारी रात्री कारवाई करत प्लांट बंद करण्याची नोटीस दिली होती. मात्र, यावर आता हायकोर्टाने आमदार रोहित पवार यांना दिलासा दिला आहे. यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पवार म्हणाले, 'बारामती ॲग्राे' च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय हायकोर्टाचे आभार मानतो... तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सूडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत राहावं.. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल, अशी टीकेची झोड पवार यांनी उठवली आहे.
पण यानिमित्ताने माझं त्यांना एक सांगणं आहे की, महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय... एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात, पण लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळं आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही..'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते'असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.
काय आहे प्रकरण..?
इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील प्लांटवर प्रदूषण मंडळाने गुरुवारी रात्री कारवाई करत प्लांट बंद करण्याची नोटीस दिली होती. 'बारामती ॲग्रो'च्या वतीने(Baramati Agro) हायकोर्टात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता हायकोर्टाने आमदार रोहित पवार यांना दिलासा दिला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. सुनावणीपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुठलीही कारवाई करू नये, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. हा रोहित पवारांसाठी मोठा दिलासा आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.