Pune : भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांनी अमिताभ बच्चन यांची सून, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. ते चांगलेच भोवले आहेत. राज्य महिला आयोगाने गावितांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तत्काळ दखल घेत आक्रमक पावले उचलली आहेत. त्यांना नोटीस धाडत तीन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, याचवेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी देखील मोठे विधान केले आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राजकीय नेत्यांना चाप बसणार असल्याचे संकेत देतानाच महिलांसंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत समिती नेमण्याबाबतही निश्चितच विचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरां(Rupali Chakankar) नी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आदिवासी विकासमंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले. चाकणकर म्हणाल्या, विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही गोष्टी सांगत असताना जो उल्लेख त्यांनी केला ते पाहता, त्यांचं वक्तव्य निश्चितच महिलांचा अपमान करणारं आहे. त्यांच्या वक्तव्यावरून राज्य महिला आयोगात काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
विजयकुमार गावितांनी(Vijaykumar Gavit) काही गोष्टी सांगत असतानाच जो काही उल्लेख केला तो निश्चितच महिलांचा अपमान करणारे हे वक्तव्य आहे. त्यासंबंधीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेत विजय कुमार गावितांना नोटीसदेखील पाठवली आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. मला असं वाटतं की, सर्वच राजकीय पक्षाने एक भूमिका घेतली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
चाकणकर नेमकं काय म्हणाल्या..?
सभागृह, कुठल्याही जाहीर सभेत महिलांबाबत अशी वक्तव्य केली जातात. कधी रस्त्यांची उदाहरणे देताना, आणखी कुठली उदाहरणे देताना प्रत्येकवेळी तुम्हाला महिला कशाला हव्यात, बरोबरी करण्यासाठी महिलाच कशाला लागतात असा सवालही चाकणकरांनी केला आहे. मी कुठल्या एका पक्षाला दोष देत नाही. पण समाजाची मानसिकता अशी असली पाहिजे की,महिलांना सन्मानच दिला पाहिजे. पण आता गावितांच्या वक्तव्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस करणार आहोतच मात्र, महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राजकीय नेत्यांना चाप बसणार असल्याचे संकेत देतानाच महिलांसंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत समिती नेमण्याबाबतही निश्चितच विचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
विजयकुमार गावित काय म्हणाले होते..?
धुळे जिल्ह्यातील मच्छीमार समाजाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना भाजप(BJP) मंत्री विजयकुमार गावित म्हणाले की, ‘मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. बाई माणसं चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसायला लागतात. कुणीही बघितलं तरी पटणार! तुम्ही ऐश्वर्या राय बघितलीय का? ऐश्वर्याचे डोळे खूप सुंदर आहेत. ती कर्नाटकातील मंगळुरूच्या किनारी भागात लहानाची मोठी झालीय. ती रोजच्या रोज मासे खायची आणि त्यामुळंच तिचे डोळे खूप सुंदर आहेत असे विधान केले होते. यानंतर मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर ऐश्वर्या माझी मुलीसारखी असल्याची सारवासारव देखील त्यांनी केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.