महिनाभर दिल्लीत थांबलो पण तिकिट नाही मिळाले : सतेज पाटलांचा आमदारकीच्या पहिल्या प्रयत्नाचा किस्सा

सतेज पाटील आज 'यिन' मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात (Yin Convention) बोलत होते.
Satej Patil, Shriram Pawar
Satej Patil, Shriram Pawarsarkarnama

मुंबई : मी १९९९ मध्ये आमदारकीसाठी उभा राहण्याचा प्रयत्न केला होता. उमेदवारीसाठी दिल्लीत एक महिनाभर होतो; मात्र, तिकीट मिळाले नाही. 'इंडिया गेट'वर बसून होतो. माझे मित्र मला कोल्हापूरला बोलवत होते. बंडखोरी करून अर्ज भरू, असे सांगत होते. मात्र, माझा विचार पक्का होता. आमदार व्हायचे, राजकारणात यायचे, समाजकारण करायचे हा विचार मनाशी ठरवला होता, अशा शब्दांत आपला जीवनप्रवास उलगडून दाखवत राज्याचे गृह आणि परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी युवकांना दिशा देण्याचे काम केले.

सतेज पाटील आज 'यिन' मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात (Yin Convention) बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, त्यानंतर कोल्हापूरला (Kolhapur) अर्ज भरण्याची वेळ निघून गेली होती. पाच वाजताचे कोल्हापूरला परतण्याचे विमान पकडले, रात्री उशिरा घरी परतलो. मात्र, इंडिया गेटवर ठरवूनच निघालो होतो की, २००४ मध्ये निवडणुकीला उभे राहायचे. पाच वर्षांत खूप काम केले. कोणाकडेही उमेदवारी मागितली नाही आणि २००४ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, राजकारणात मी १९९२ मध्ये सक्रिय झालो. शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदी माझी निवडणूक झाली होती. त्यानंतर निवडणुका बंद झाल्या होत्या. निवडणुका झाल्या असत्या तर नवीन नेतृत्व तयार झाले असते. त्यावेळी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्यांचा मतदार संघ होता. त्यावेळेस तिथल्या युवकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यातून निवडून येणे हे फार कष्टाचे काम होते. वर्षभर प्रचंड काम करून विद्यार्थ्यांसाठी भूमिका मांडली होती, असा अनुभवही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Satej Patil, Shriram Pawar
राज्यपालांचा दे धक्का! विधानसभेचे अधिवेशन बोलावले पहाटे दोन वाजता

यावेळी पाटील म्हणाले की ''आपण जर एखादे स्वप्न बघितले तर ते पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी. तशी मानसिकता आणि विचार तयार झाले पाहिजेत. 'यिन'च्या माध्यमातून प्रबळ विचारांची देवाणघेवाण होते. येत्या काळात तुमचे-आमचे भवितव्य सोशल मीडिया ठरवणार आहे; पण त्याचाही जपून वापर करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. इच्छा-आकांक्षा असणाऱ्या नव्या विचारांच्या पिढीला भेटून संवाद साधणे यात निश्चितच नवी उमेद, नव्या संकल्पना पुढे याव्यात, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. इच्छाशक्तीच्या विचारातून माणूस पुढे जातो. वर्तमानपत्र आणि जाहिरातींपलीकडे जाऊन 'सकाळ'ने समाजातील प्रत्येकाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न 'यिन'च्या माध्यमातून संपूर्ण देशात केला आहे. महाविद्यालयाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात काम करण्याची वेळ येते तेव्हा त्यातील अडचणी आणि समस्या वेगळ्या असतात. स्वप्न बघण्याची संधी 'सकाळ'च्या माध्यमातून उपलब्ध झाली, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

आपण आज देशात लोकशाहीच्या माध्यमातून सर्व व्यवस्था पार पाडत आहोत. ६०-७० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून देशाला स्वतंत्र करण्याची भूमिका घेतली. त्या वेळेस स्वातंत्र्य मिळेल की नाही, यात शंका-कुशंका होत्या. मात्र, विचार पक्का असेल तर कृतीची धारही आली पाहिजे. वक्तृत्व असून चालत नाही, तर कृतीही करावी लागते, हे सात वर्षांपासून आम्ही अनुभवतो आहोत. अनेकदा व्यवस्थेला आपण नावे ठेवतो. त्यातून आपणही नकारात्मक व्हायचे का, हादेखील विचार केला पाहिजे. जुने ते चांगले नव्हते, असे म्हणता येणार नाही. मात्र, नव्याची संकल्पना मांडून पुढे गेले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

Satej Patil, Shriram Pawar
मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा; तिन्ही मागण्या केल्या मान्य

सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. सत्य आणि असत्यतेचा मार्ग कुठे थांबतो आणि कुठे सुरू होतो हे आपल्याला कळत नाही. ३० वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि प्रलोभने वेगळी होती. मात्र, सुदैवाने इंटरनेटचा वाढलेला वापर आणि दुर्दैवाने एका क्लिकवर १० लाख प्रलोभने आजच्या पिढीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आता विचार आणि शिक्षणाने सक्षम होणे ही गरज आहे. आपली वैचारिक प्रगल्भता बदलली पाहिजे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही, फक्त कष्ट करण्याची मानसिकता हवी, असेही ते म्हणाले. इतिहास पाहिला तर जगात जी माणसे मोठी झालीत त्या प्रत्येकाने कष्ट केले आहे. परिस्थितीला दोष न देता ती स्वीकारून पुढे गेले पाहिजे. शिक्षण, समाज, राजकारण किंवा कोणत्याही वेगवेगळ्या क्षेत्रात असेल असे एक तरी काम केले पाहिजे, ज्यातून लोकांनी आपल्याला आठवणीत ठेवले पाहिजे, असेही पाटील यांनी नमूद केले.

पुढची ५० वर्षे तुमची!

येत्या काळात तुमचे-आमचे भवितव्य सोशल मीडिया ठरवणार आहे. मात्र, त्याचाही जपून वापर करणे गरजेचे आहे. भविष्यातील पुढची ५० वर्षे ही तुमची आहेत. ती चांगली ठेवायची असेल तर बंधू-भावाची भूमिका ठेवावी लागणार, असे मत पाटील यांनी मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com