Pune News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांकडून उघडपणे विरोधाचे समोर येऊ लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याच्या शक्यतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'अजित पवार यांच्यासोबत आता कशासाठी जावं? त्यांच्यावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास राहिलेला नाही,' असे म्हणत अनेकांनी आपली भूमिका मुंबई येथील सुरू असलेल्या बैठकीत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पुढील तीन दिवस या बैठका सुरू राहणार आहेत. या बैठकांदारम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या.
काहींनी तर लेखी स्वरूपातही पक्षाकडे विलीनीकरणाबाबत आपला विरोध नोंदवला असल्याचं सांगितलं जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही यासंदर्भात संभ्रम असून, पक्ष नेतृत्वाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे चर्चा सुरू असला तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला मुहूर्त लागणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्याचे आदेश पक्षाच्या सर्व जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीला दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातील गणांचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल पक्षाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त महाविकास आघाडी व्हावी यासाठी नेतृत्व आग्रही आहे. आघाडीचा निर्णय लवकर झाला नाही, तर स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट निर्देश स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.
तसेच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले असून, पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्षम राहावी यासाठी विविध स्तरांवर संवाद सुरु ठेवणे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणे, स्थानिक प्रश्नांची माहिती घेणे आणि निवडणूक रणनीती आखणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असल्या तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी देखील करण्यात येत आहे. असं असलं तरी अजित पवार सोबत असल्यास आपल्या विजयाची गॅरंटी अधिक वाढेल या दृष्टिकोनातून विलिनीकरणाकडे आस लावून बसलेल्या मोठा गट मात्र या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.