ठाणे : आगामी महापालिका निवडणुकीत उल्हासनगरमध्ये शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसमध्ये (congress) आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, राज्यात चालत असलेला या तीन पक्षांच्या फॉर्म्युल्याला ठाण्यात फाटा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे (Thane) महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेत कुणाचाही वाटा नको, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नेत्यांची आहे. अस्तित्वासाठी झटणाऱ्या काँग्रेसने आधीच एकट्याने निवडणुका लढण्याचे जाहिर केले आहे. दुसरीकडे आघाडीसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीनेही आता ‘एकला चलो रे’ ची हाक दिली आहे. (Shiv Sena is preparing to contest municipal elections in Thane on its own)
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४, भाजपचे २४ तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. त्रिसदस्य पॅनेलने होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १४२ पर्यंत वाढली आहे. यामध्ये स्पष्ट बहुमतासाठी ७२ नगरसेवकांचे बळ आवश्यक आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. भाजपसोबत युती असतानाही शिवसेनेचेच पालिकेवर वर्चस्व होते, तर गेल्या पालिका निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही भाजपशी फारकत घेऊनही ठाण्यात शिवसेनाच नंबर एकचा पक्ष ठरला होता. दुसरीकडे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतही शिवसेनेच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्तेत वाटा देण्यास शिवसेनेनेचे स्थानिक नेतृत्व तयार नसल्याचे समजते.
काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसेल तर शिवसेना, राष्ट्रवादीची आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीची ताकद कळवा- मुंब्रापुरती सिमित राहिली आहे. शहरात पक्षाला बळ देण्यासाठी महाआघाडी करण्याची शिफारस करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांच्या जागा कायम ठेवाव्यात आणि उर्वरित जागांचे समान वाटप करावे, असे सूत्र मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, राष्ट्रवादीचा फॉर्म्युला स्वीकारला, तर शिवसेनेच्या वाट्याला ८० ते ८५ जागाच येतील. त्यातून मॅजिक फिगर गाठणे शिवसेनेला अशक्य होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी शहरात हातपाय पसरून त्यांना सत्तेतही वाटा द्यावा लागेल, त्यामुळे निदान ठाण्यात तरी महाविकास आघाडी नको, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या सर्वच स्थानिक नेत्यांची आहे.
आव्हाडांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन
आघाडीसाठी राष्ट्रवादी सुरुवातीपासून आग्रही असली तरी ठाण्यात हे होणे शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही तसे संकेत देत राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काहीशी बॅकपूटवर गेली आहे. मात्र, निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक न करता विकास हाच मुद्दा ठरवत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीआधी आघाडी झाली नसली तरी नंतर ती होणारच नाही, असेही म्हणता येणार नाही.
स्वबळावर सत्ता स्थापण्यास शिवसेना सक्षम
ठाणे महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास शिवसेना सक्षम आहे. पण, येत्या निवडणुकीत महाआघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.