
Mumbai : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. रोज नवनवीन राजकीय घडामोडी, आरोप- प्रत्यारोपांनी युती आणि आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं लपून राहिलेलं नाही. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याच्याही शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचवेळी आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी अपडेट समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील या दोन्ही नेत्यांनी रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार व मंत्री पाटील या दोघांमध्ये राजकीय विषयांसह जळगाव जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत. मात्र, दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मागील वर्षी जून महिन्यात शिवसेने(Shivsena)त झालेल्या बंडखोरीदरम्यान आमदारांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून निधीवाटपात भेदभाव व पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला होता. याचवरुन एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. त्यानंतर आता बंडखोर आमदार व मंत्री गुलाबराव पाटलां(Gulabrao Patil) नी थेट पवारांसोबतच एकत्र मुंबई ते जळगाव प्रवास केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना जोर धरु लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार(Sharad Pawar) हे शुक्रवारी( दि.16 जून) जळगाव दौऱ्यावर येत आहेत. यावेळी अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर/ कार्यशाळेचे त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार असून मार्गदर्शन देखील करणार आहेत. या कार्यक्रमासाठी गुरुवारी शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत गाडीत बसले. यादरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा दिसून आले.
'त्या' पाच मंत्र्यामंध्ये गुलाबरावांचं नाव..?
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या रखडलेल्या मंत्रिमंडळात विस्तारावरुन आधीच डच्चू देण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दिले आहेत.
या पाच मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे. मात्र,याचवेळी असा काही निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बैठकीत झाला नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.