Mumbai News: भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. या गोळीबाराच्या प्रकरणानंतर राज्यातील कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. (CM Eknath Shinde)
यानंतर आता विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे गुन्हेगारांबरोबरचे फोटो 'एक्स'वर पोस्ट करत जहरी टीका करण्यात येत आहे. आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा फोटो 'एक्स'वर (ट्विट) शेअर केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार संतोष बांगर आणि गुंड निलेश घायवळ दिसत आहेत. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही एक व्हिडिओ ट्विट करत गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल धन्यवाद, असा खोचक टोला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
"महाराष्ट्रात गुंडा राज..गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत ? त्यांचे नेमके कर्तुत्व काय ? याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय ? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे, मोदी-शाह यांच्या राज्यकर्त्या टोळीने", असे'एक्स'वरील पोस्टमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.
"गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन, उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती "मोदी की गॅरंटी"?, असं ट्विट करत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत जोरदार टीका केली.
तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले असून यानंतर 'सिमी'शी कनेक्शन असलेला गुन्हेगार असिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा फोटो ठाकरे गटाने बातमीत छापत जहरी टीका केली आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.