Pune News: हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणाऱ्या कात्रज कोंढवा रस्त्याचा निधी श्रेय वादाच्या लढाईत अडकलेला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याच नेत्याने हा निधी मंजूर करावा, यासाठी तिन्ही पक्षातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले नेते आग्रही आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने हा 200 कोटींचा निधी अडकला असून परिणामी रस्त्याचं काम संथ गतीने सुरू आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघावर महायुतीतील तिन्ही पक्ष आपला दावा ठोकताना दिसत आहेत. मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे हे आहेत. त्यांनी भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता.
तत्पूर्वी 2014 मध्ये योगेश टिळेकर हे चांगल्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजयी झाले होते. तर शिवसेना शिंदे गट पुण्यामध्ये सर्वाधिक ताकदवान हा हडपसर मतदार संघामध्येच आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचे प्राबल्य आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून या मतदारसंघामधून आमदारकीची निवडणूक लढवण्यास नाना भानगिरे देखील इच्छुक आहेत. तिन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ उमेदवार असल्याने महायुती असून देखील कुरघोडीचे राजकारण या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे.
कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला 31 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता मिळाली असून या भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी 710 कोटी हवे आहेत.
भूसंपादनामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या या रस्त्याची रुंदी 84 ऐवजी 50 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्याची रुंदी कमी केल्याने भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी 200 कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत. हा निधी पुरवणी मागणीमध्ये मंजूर झाला आहे. परंतु,आठ महिने होऊनही अद्याप हे २०० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले नसल्याने रस्त्याचे काम ढेपाळले आहे.
रस्ता तुकड्या तुकड्यातकात्रज-कोंढवा रस्ताचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. टीडीआरचे दर कमी झाल्यामुळे जागा मालकांकडून भूसंपादनसाठी रोख रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०० कोटींच्या निधीची गरज आहे.
आठ महिन्यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले होते . पण पालिकेला हा निधी मिळालेला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निधी देण्याचा आश्वासन दिलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर मागील महिन्यात अजित पवार यांनी अचानक कात्रज कोंढवा रस्त्याला भेट दिली आणि रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. तसेच 200 कोटी कॅबिनेट नोट पुढच्या आठवड्यात येईल असा शब्द दिला. मात्र दिलेला हा शब्द तिन्ही नेत्यांनी पाळला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. मात्र यामागे आता श्रेय वादाची लढाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्या पक्षाचा नेता हा निधी मंजूर करून देईल, त्या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे . त्यामुळे हा फायदा आपल्या पक्षाला मिळावा यासाठी तिन्ही पक्षातील नेते आग्रही असून आपल्याच नेत्याने हा निधी मंजूर करावा यासाठी आग्रही आहे. त्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवर निधीला मंजुरी मिळत नसून रस्त्याचे काम मात्र रखडले आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.