

Mumbai News, 01 Feb : 'अजित पवारांचे जाणे धक्कादायक आहे. त्यांचे अचानक निघून जाणे महाराष्ट्राच्या राजकारणाला परवडणारे नाही. ते नेतृत्व करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय? या प्रश्नापासून पुढे अनेक प्रश्नांचा गुंता निर्माण झाला आहे. अजित पवारांचे राजकारण हे स्वतंत्र बाण्याचे होते. शिंद्यांप्रमाणे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी द्यायला गेले नाहीत.'
अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून अजित पवारांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी लिहिलं की, अजित पवार महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले. हा विक्रम आहे.
त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण ते होऊ शकले नाहीत. अजितदादांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले त्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचा अनुभव, आवाका, लोकप्रियता जास्त होती, पण नशिबाने त्यांना या बाबतीत साथ दिली नाही. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपच्या सोबत गेले व मुख्यमंत्री झाले. यावर दादा गमतीने म्हणाले, “ही ऑफर मला आली असती तर शिंद्यांच्या आधी मी गेलो असतो!” पण भाजपच्या सोबत दादा गेले व उपमुख्यमंत्री पदावरच स्थिरावले.
ते भाजपबरोबर गेले, पण विचारांची चौकट मोडली नाही. उदारमतवादी, निधर्मी म्हणूनच ते काम करीत राहिले. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांप्रमाणे ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी गेले नाहीत. ते लवचिक होते, पण फार झुकले नाहीत. शरद पवारांनी मनात आणले असते तर अजित पवारही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण त्यांची राजकीय घोडदौड उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदावरच थांबली. तरीही अजित पवारांची राजकारणावरची पकड सुटली नाही.'
राऊतांनी पुढे लिहिलं, 'अजित पवारांचे नेतृत्व वारशाने आणि घराणेशाहीतून उभे राहिले. अजित पवारांनी रस्त्यावरच्या लढाया केल्या नाहीत. पवार कुटुंबाचा वारसा व शरद पवारांचे भक्कम पाठबळ त्यांना मिळाले, पण अजित पवारांनी स्वत:तला नेता विकसित केला. ते सतत लोकांत गेले. कार्यकर्त्यांशी संवाद केला. पक्ष संघटनेत लक्ष घातले. पुढे ते स्वयंभू बनले व शरद पवारांच्या हयातीत राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व निर्माण केले आणि पुढे तीच संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन भाजपच्या तंबूत गेले.
पण महाराष्ट्राने जेवढा संताप एकनाथ शिंदेंच्या बाबतीत व्यक्त केला, तेवढा संताप अजित पवारांच्या बाबतीत दिसला नाही. याचे कारण पवारांचे लोभस व्यक्तिमत्त्व. अजित पवारांचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही. अजितदादांचे आमदार त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. अजित पवार परत फिरले व शरद पवारांच्या कृपेने उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. त्या सरकारात ते अडीच वर्षे इमानाने राहिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू व अनुभवी सहकारी म्हणून वावरले. शिंदे हे आमदार घेऊन सुरतला पळाले तेव्हा अजित पवारांनी टीका केली. तेच अजित पवार पुढे शरद पवारांचा पक्ष फोडून, आमदार घेऊन भाजपच्या सरकारात गेले, पण शिंद्यांप्रमाणे पूर्ण भाजपमय झाले नाहीत. त्यांनी आपले सत्त्व गमावले नाही, असही सामनात म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवारांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. पण त्या प्रतिमेवर शरद पवारांची सावली शेवटपर्यंत राहिली. ते चतुर आणि चाणाक्ष होते. शरद पवारांप्रमाणे ते गर्दीतले नेतृत्व होते. अजित पवारांबरोबर होते ते `लोक’ ही शरद पवारांनी घडवलेली पिढी आहे. त्यामुळे अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले तरी ते सर्व शरद पवारांचे मोठेपण, उपकार मान्य करीत राहिले. हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, तटकरे, मुंडे ही सर्व शरद पवारांचीच माणसे. पवारांनी महाराष्ट्रात स्वत:चे जाळे निर्माण केले.
ते जाळे अजित पवारांना सहज मिळाले. सत्ता व पैसा हे महाराष्ट्राचे राजकीय समीकरण अजित पवारांनाही मानावे लागले. पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवड ही त्यांची प्रभावक्षेत्रे. या क्षेत्रांत पालकमंत्री म्हणून अजित पवार सतत सक्रिय राहिले. एकेकाळी पुण्याची जहागिरी शरद पवारकृपेने सुरेश कलमाडींकडे होती. कलमाडी यांनी अजित पवारांमुळे शरद पवारांना सोडले. त्यानंतर अजित पवार हे पुण्याचे `पालनहार’ बनले. पंधरा दिवसांपूर्वी कलमाडी गेले व आता अजितदादा गेले.
अजित पवारांचा मृत्यू अकल्पित आहे. पवारांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे वळण बदलेल. राज्याला उपमुख्यमंत्री पन्नास मिळतील, पण अजित पवारांसारखा अनुभवी अर्थमंत्री मिळणार नाही. अलीकडे बहुसंख्य मंत्री मंत्रालयात जात नाहीत. अजित पवार त्यास अपवाद होते. अजित पवार फटकळ होते, पण राजकारणातून अस्तंगत होत चाललेली `दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची कला’ अजितदादांकडे होती. ते निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नसत. राज्यकर्त्याने `राज्य’ करावे या भूमिकेशी ते प्रामाणिक होते.
दादांवर भ्रष्टाचाराचे सर्वात जास्त आरोप भाजपने केले, पण सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करूनही मी त्यांच्याच सरकारमध्ये बसलोय ना? असा शालजोडीतला मारायला ते मागेपुढे पाहत नसत. दादा आता नाहीत. त्यांना पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या गुणांची तारीफ केली.
दादांना खरी श्रद्धांजली कोणती? त्यांच्यावर केलेले सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप मागे घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली. मोदी-फडणवीस ते करतील काय? की पुढच्या प्रजासत्ताक दिनी दादांना एखादा मरणोत्तर पद्मभूषण देऊन आपल्या दातृत्वाचे ढोल वाजवतील? असा सवाल कर राऊतांनी पुन्हा एकदा भाजपने अजित पवारांवर केलेल्या आरोपांची आठवण करून दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.