Sanjay Raut : 'भविष्यात शिंदे-अजितदादा...'; ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं भाकीत

Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : 'राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो', असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला मागील तीन-साडेतीन वर्षापासून चांगलाच येत आहे. त्यामुळे सध्याचे राजकीय नेते कधी कोणासोबत युती-आघाडी करतील हे सांगणं कठीण झालं आहे.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Sanjay Raut
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 18 Dec : 'राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो', असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला मागील तीन-साडेतीन वर्षापासून चांगलाच येत आहे. त्यामुळे सध्याचे राजकीय नेते कधी कोणासोबत युती-आघाडी (Mahayuti) करतील हे सांगणं कठीण झालं आहे.

अशातच 'एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन' अशा शब्दात फडणवीसांना आव्हान देणारे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

तर दुसरीकडे रोज महायुती आणि भाजप सरकारवर हल्लाबोल करणारे ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या भेटीवर काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. अशातच आता सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी महायुती सरकारवर आणि मंत्रि‍पदे न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

त्यामुळे ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतरही राऊतांनी आपला आक्रमकपणा कमी न केल्याचं पाहायला मिळत आहे. तर भविष्यात शिंदे व अजित पवार (Ajit Pawar) निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात 'ईडी'च्या चौक्या कायमच्या लावल्या जातील! महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण या पद्धतीने, असं म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Sanjay Raut
Ajit Pawar : नागपुरात असूनही अजितदादांची अधिवेशनाकडे पाठ; 'नॉट रिचेबल' राहण्याचा 'एजन्सी'चा सल्ला? चर्चांना उधाण

तर चाळीसेक जणांचा शपथविधी होऊनही सरकारात सुखशांती दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी सामना अग्रलेखात लिहिलं की, महायुती सरकारचा शपथविधी रुसवे, फुगवे, रागालोभामुळे लांबला. आता चाळीसेक जणांचा शपथविधी होऊनही सरकारात सुखशांती दिसत नाही. नाराजांनी उघडपणे आपला अंगार बाहेर काढला आहे. त्या अंगाराच्या कितीही ठिणग्या उडाल्या तरी सरकारला चटके बसणार नाहीत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार यांच्याशिवाय सरकार रेटून नेण्याइतपत बळ भाजपकडे आहे आणि कमी पडलेच तर दोन्ही मित्रपक्ष फोडून बहुमताचा आकडा जुळविण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलिस फोर्स आहेच. नागपुरात रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. दिल्लीहून याद्या मंजूर होऊन आल्यावर मंत्र्यांनी शपथ घेतली. स्वाभिमान वगैरेसाठी ज्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली अशा शिंदे-अजित पवार गटांच्या याद्याही दिल्लीत अमित शहांच्या नजरेखालून मंजूर होऊन आल्या व त्यानुसार मंत्र्यांच्या शपथग्रहणाचा कार्यक्रम पार पडला.

छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण अशा प्रमुख नेत्यांना वगळले आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना दिल्लीच्या आदेशाने नारळ देण्यात आला, पण संशयास्पद मृत्यू झालेल्या पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाची शपथ दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडक्या बहिणींवरचे प्रेम म्हणजे ढोंग आहे हे सिद्ध झाले, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis : 'सीएम' फडणवीसांच्या 'या' लाडक्या आमदारानं केली मोठी मागणी, म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेत...'

भुजबळांना वाऱ्यावर सोडले

तर नाराजांची खदखद बाहेर पडत आहे. छगन भुजबळांनीही उघड नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी टोकाचा पंगा घेतला. हे भांडण भुजबळ यांनी इतके शिगेला नेले की, विधानसभेत जिंकूनही जरांगे व मराठा समाजाला दुखवायचे नाही या एका कारणासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही.

भुजबळांना पुढे करून फडणवीस यांनी त्यांची जरांगेंविरुद्धची लढाई खेळली. आता भुजबळांना वाऱ्यावर सोडले. वापरले आणि फेकून दिले. भुजबळांनी ज्या पद्धतीने शरद पवारांना सोडले त्याची फळे ते भोगत आहेत. सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांचे नेमके काय झाले ते दिल्लीलाच माहीत. "माझे नाव शेवटपर्यंत यादीत होते हो!’" असा दावा सुधीर मुनगंटीवार करतात. मग त्यांचे नाव कोणी कसे वगळले? त्यांच्या नावावरच्या शाईवर कोणी पाणी शिंपडले काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

रडारड संपलेली नाही

दरम्यान, राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही. प्रकाश सुर्वे, लाड, दरेकर, राम शिंदे, शिवतारे अशा अनेकांना हुंदके फुटले आहेत. अशा नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही. कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे.

त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात 'ईडी'च्या चौक्या कायमच्या लावल्या जातील! महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण या पद्धतीने, अशा शब्दात त्यांनी महायुती सरकार आणि नाराज नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com