
Kalyan Dombivli political case : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे सेना पक्षाला घेरण्यासाठी विविध रणनीती आखली जात आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळ्या मार्गानं टार्गेट केल्याचं दिसते आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढणारे शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या उशिरानं दाखल झालेल्या गुन्ह्यामागे नक्कीच काहीतरी राजकीय दबावातून शिजल्याचं चर्चा आता रंगली आहे. यावर जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कितीही दबाव आणला तरी आता थांबतच नसतो, असा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) मुख्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मागील आठवड्यात मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि नऊ पदाधिकाऱ्यांसह 125 शिवसैनिकांवर बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस (Police) कर्मचारी विशाल चौधरी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. केडीएमसीने कचरा शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ अन्यायकारक असल्याने ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयावर मोर्चा काढला होता.
सहाय्यक पोलिस आयुक्तांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अटीवर मोर्चाला परवानगी दिली होती. दरम्यान, सुमारे 250 शिवसैनिकांचा मोर्चा पालिकेच्या प्रवेशद्वारावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी मनाई आदेशाचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, उपनेते विजय ऊर्फ बंड्या साळवी, बाळा परब, साईनाथ तारे, राजेश महाले, धनंजय बोडारे, तात्या माने, प्रकाश तेलगोटे, वैशाली दरेकर, अल्ताफ शेख या पदाधिकाऱ्यांसह 125 शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी लढतो आहे. प्रशासनाने किती गुन्हे दाखल करायचे ते करू द्या. लोकहितांच्या कामासाठी आता आम्ही थांबतच नसतो. शिवसेना ठाकरे पक्षाच्या माध्यमातून लढा देत राहू, असा इशारा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.