Shivsena News : शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण डोंबवलीच्या जागेवरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेना शिंदे गटांत मतभेद आहेत का ? अशी शंका घेण्यास शिंदे शिवसेना गटाकडून जाहीर झालेल्या यादीवरून वाव मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटाने गुरुवारी आठ जणांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने ऐन निवडणूक काळातच विरोधकांना चर्चेला विषय मिळाला आहे. येत्या काळात शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर होईपर्यंत, या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. (Shrikant Shinde News)
कल्याण-डोंबवलीच्या जागेवरून या पूर्वीच शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. दोन्ही पक्षाकडून कल्याणच्या जागेवरून रस्सीखेच पहावयास मिळत होती. त्यातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे पदधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये फारसे सख्य असल्याचे दिसत नाही.
तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत तीन पक्षांत चर्चा झाली. त्यामध्ये रायगड, नाशिक, यवतमाळ वाशिम, ठाणे, बारामती या जागांचा तिढा सुटला. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून आठ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, शिंदे शिवसेना गटाच्या आठ जणांच्या यादीत विद्यमान सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. केवळ रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यासोबतच कल्याण डोंबवली मतदारसंघातून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), यवतमाळ वाशिम - भावना गवळी, पालघर - राजेंद्र गावित, नाशिकमधून हेमंत गोडसे, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar ) अशा पाच जणांच्या उमेदवारींची घोषणा करण्यात आलेली नाही.