Sanjay Raut on Prakash Ambedkar News : शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत असा गौप्यस्फोट करुन प्रकाश आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. यावर राष्ट्रवादीकडून आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली जात असतानाच आघाडीतील नेत्यांनीही आंबेडकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर शरद पवारांबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी उध्दव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली होती. यावेळी आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यातील वादाचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. मात्र, महाविकास आघाडीत आंबेडकरांना सहभागी करुन घेण्यास कुणाची ना नाही असं विधान ठाकरेंनी केलं होतं.
मात्र, युतीची घोषणा होऊन काही तास उलटतानाच आंबेडकरांनी आपली युती ठाकरे गटाशी असून महाविकास आघाडीच सहभागी होण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होत. याचवेळी त्यांनी शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचं खळबळजनक विधान केलं होतं. मात्र, त्यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीकडून आंबेडकरांवर हल्लाबोल करण्यात येत असून ठाकरेंना अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकरांच्या विधानावर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, भाजपाच्या यंत्रणांनी सर्वात जास्त हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारची विधानं कोणीही करु नये. शरद पवार यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे असा सल्लावजा सूचना राऊतांनी आंबेडकरांना केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे घटक होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीचा भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे. मतभेद असले तरी त्यांच्याविषयी बोलताना आदर ठेवून बोललं पाहिजे असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?
वंचित बहुजन आघाडीचे नेते व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत असं वक्तव्य केलं होतं.
तसेच यावेळी त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं असा गौप्यस्फोट करत आंबेडकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.