Dombivli News : विरोधकांच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा लवकरच समावेश केला जाणार आहे. यावर श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ''विरोधकांना सगळ्यांना एकत्र करून नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका लढवल्या होत्या, त्याच निकाल काय आला हे सगळ्यांनी पाहीलं आहे. जनतेने आपण कोणाबरोबर आहोत हे यातून दाखवून दिलं आहे. ''
तसेच, ''त्यामुळे आगामी काळात कितीही विरोधक एकत्र आले तरी त्यांना पुरून उरण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे. त्यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणूक आम्ही लढू आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार निवडून हे लोकसभेवर जातील. एका माणसासमोर सगळे इम्पॅक्टलेस आणि मोदी इम्पॅक्टफुल असंच चित्र आपल्याला दिसणार आहे.'' असा दावा श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व दिपेश म्हात्रे फाऊंडेशन यांच्यावतीने महाआरोग्य शिबिर भरविण्यात आले आहे. या शिबिरास रविवारी खासदार शिंदे यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत व खासदार अमोल कोल्हे यांच्यावर तसेच इंडिया अलायन्स यांच्यावर टीका केली.
याशिवाय, राष्ट्रवादी(पवार गट) काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी पनवेल येथे बोलताना सरकारची तुलना बैलांशी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ''ज्याची बुद्धी जिथपर्यंत चालते, मला वाटतं त्याचप्रमाणे ही लोकं भाष्य करत असतात. मला वाटतं आता विरोधकांकडे काही राहिलेलं नाही. विरोधकांनी केवळ रोज उठून टीका करायची, एवढच विरोधकांसाठी आम्ही काम ठेवलेलं आहे.''
कारण, ''जर तुम्ही पाहीलं असेल तर लोकांपर्यंत पोहचण्याचं काम सरकार करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. लोकांसाठी जे निर्णय असतील त्याचबरोबर सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम असेल, त्याद्वारे कोट्यवधी लोकांना लाभ मिळणार असेल. विविध योजना सामान्यांसाठी आम्ही आणतो आहोत. हे पाहून विरोधक बिथरले आहेत.
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचेही निकाल समोर आले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला प्रश्न पडला आहे की आता पुढे काय करायचं? म्हणून आता त्यांच्याकडून रोज उलटसुलट टीका केली जात आहे.'' अशा शब्दांत श्रीकांत शिंदेनी पलटवार केला आहे.
याचबरोबर रामलल्लाचं फुकट दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना खासदार शिंदे यांनी सांगितले की, ''आपल्या इथल्या नागरिकांना जर रामलल्लाचं दर्शन मोफत मिळालं. तर त्यामध्ये सरकार काही वाईट करतं आहे का?
अयोध्येत रामलल्लाचं दर्शन कधी उभारलं जाईल, याची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अखेर आता ते मंदिर तयार झालं आहे. केवळ खोटी आश्वासनं दिली गेली नाहीत, खोट्या घोषणा केल्या नाहीत. तर रामलल्लाचं मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं. हे केल्यानंतर लाखो कारसेवक, जे रामभक्त आहेत त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुवर्णक्षण हा 22 जानेवारी असणार आहे. त्यामुळे लाखो, कोट्यवधीच्या संख्येत रामभक्त अयोध्येत जाणार आहेत.''
तसेच, ''मला असं वाटतं की आता ज्याप्रकारे लोकांचा विश्वास पंतप्रधान मोदी(Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर वाढत चालला आहे. यामधून आता विरोधकांना वाचण्याचा कुठलाच मार्ग सापडत नाही. त्यांना वाटलं की आम्ही आता भारत जोडो यात्रा केली तर काहीतरी मिळवलं. परंतु त्याचा निकाल नुकत्याच झालेल्या तीन-चार विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसलेला आहे. लोक विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देण्याचं काम करत आहेत. म्हणून एवढ्या मोठ्याप्रमाणावर यश मिळालं आहे.
आगामी 2024च्या निवडणुकीत एनडीएला कधीही मिळालं नाही तेवढं यश मिळणार आहे. हे पाहून विरोधकांचे सगळे प्रयोग करून झाले, इंडिया आघाडी करून झालं, भारत जोडो झालं आता आणखी काय करणार? आता टीकेशिवाय पर्याय नाही, म्हणून हे सगळे रिकामटेकडेच बसलेले आहेत आणि त्यांना पुढेही रिकामटेकडंच बसायचं आहे.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.