
Thane issues : ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात आज सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी खुद्द शिंदेंसमोरच समस्यांचा पाढा वाचला. प्रदुषण, महागडी घरे, आरोग्य, शिक्षण आदी मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर शिंदेंनीही आपल्या भाषणात काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.
न्यायमूर्ती ओक आणि शिंदे आज एका कार्यक्रमानिमित्त ठाण्यात एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रमात न्यायमूर्ती ओक यांचे भाषण सुरूवातीला झाले. जन्म ठाण्यात आणि ठाण्यातच वाढलो असे सांगत न्यायमूर्ती ओक यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. काही जुन्या आठवणी सांगितल्यानंतर त्यांनी समस्यांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली.
न्यायमूर्ती ओक म्हणाले, ठाण्यात काही गोष्टी अशा ज्या मी आवर्जून सांगितल्या पाहिजेत. ठाण्यात 40 मजली, 50 मजली इमारती होत आहेत. ही सामान्य माणसाला न परवडणारी घरे आहेत. सामान्य माणसाला परवडतील, अशा वैद्यकीय सुविधा ठाण्यात किती उपलब्ध आहेत? सामान्य माणसाला परवडतील, अशा किती शाळा उपलब्ध आहेत? शिक्षणाच्या सुविधा किती उपलब्ध आहेत, याचा आपण विचार केला पाहिजे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे घटनेच्या 21 व्या कलमाप्रमाणे प्रदुषणमुक्त वातावरणात राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ठाण्यात आपण किती नवी उद्याने बांधली? अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत. असे एकतरी सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभे केले का? नाही केले. ही उद्याने उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल, असेही न्यायमूर्ती ओक म्हणाले.
न्यायमूर्ती ओक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला. जिल्हाधिकाऱ्यांना याची नोंद घेण्यास सांगितल्याचे शिंदेंनी सांगितले. ते म्हणाले, ओक साहेबांनी काही सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नोंद घेण्यास सांगितले आहे. ठाण्यात 25 एकरात सेंट्रल पार्क उभे केले आहे. खूप चांगले पार्क आहे. कधी वेळ असेल तेव्हा येण्याचा आग्रहही शिंदेंनी केला. ठाण्यात छोटी-मोठी 145 उद्याने असल्याची माहितीही शिंदेंनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.