
Impact on Upcoming Elections : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी कर्नाटकातील एका मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळावरून भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. याद्यांमध्ये हेराफेरी सुरू असल्याचा दावा करत त्यांनी काही उदाहरणेही दिली होती. त्या प्रकरणांची मीडियाने खातरजमा केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचे यानिमित्ताने पितळ उघडे पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
राहुल यांनी पत्रकार परिषदेत महादेवपुरा मतदारसंघातील एका घराचे उदाहरण दिले होते. सुमारे 200 चौरस फुटाच्या या घराच्या पत्यावर तब्बल 80 मतदारांची नोंदणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. काँग्रेसची टीमही या पत्त्यावर गेली होती. पण तिथे त्यांना असे काहीही आढळून आले नाही. ही राहुल यांनी दिलेली माहिती. पण स्थानिक बीएलओने एका वृत्तवाहिनीला दिलेली माहिती धक्कादायक आहे.
बीएलओ मुनीरत्न यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी ज्याप्रकारे सांगत आहेत, तसे काही नाही. महादेवपुरातली मुनीयप्प रेड्डी गार्डमध्ये घर क्रमांक 35 मध्ये 80 मतदारांची नोंदणी आहे. हे घर छोटे आहे. केवळ 10 बाय 15 फुटांचे आहे. या भागातील बहुतेक घरांमध्ये लोक भाडेतत्वावर राहतात. भाडेकरू बदलतही असतात. मागील 14 वर्षांत इथे कुणीच कायमस्वरुपी राहायला नव्हते.
नोकरी, बँक खाते, किंवा गॅस कनेक्शनसाठी त्यांना पत्ता आवश्यक असतो. त्यासाठी ते भाडे करार करून मतदार ओळखपत्रही बनवतात. पण नंतर काही काळाने घर सोडून जातात. पण त्यांचे नाव मतदारयादीत तसेच राहते. 2014 पूर्वी ज्या लोकांची नावे नोंदविली होती, त्यांची यादी बनवून ती वगळण्यासाठी निवडणूक आयोगाला दिली होती. पण आयोगाच्या नियमांनुसार त्यांची नावे अजून हटवलेली नाहीत. निवडणुकीवेळी लोक येतात आणि मतदान करतात. बीएलओंनी दिलेली ही माहिती धक्कादायक आहे.
केवळ भाडे करार करून जर एखाद्या व्यक्तीला मतदान ओळखपत्र मिळत असेल तर एकाच व्यक्तीचे देशात अनेक ठिकाणच्या मतदारयादीत नाव असल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्या देशात बहुतेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी मतदान असते. विविध राज्यांमध्ये मतदान असलेले मतदार सगळीकडे सहजपणे मतदान करू शकतात. हे वास्तव आहे. दुसरे उदाहरणही तितकेच गंभीर आहे.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचे उदाहरण दिले होते. याच व्यक्तीचे मुंबईसह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील मतदारयादीत नाव असल्याचे त्यांनी दाखविले होते. दुसऱ्या दिवशी आदित्य यांनी मीडियाशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. ते मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. तिथे त्यांचे मतदारयादीत नाव होते. तिथून ते नोकरीनिमित्त मुंबईत आले. त्यासोबत त्यांनी उत्तर प्रदेशातून आपले मतदान मुंबईत शिफ्ट केले. नंतर ते बेंगलुरूमध्ये गेले. तिथेही अशीच प्रक्रिया केली. ज्यावेळी मतदान असेल त्यावेळी त्यांनी त्यावेळी राहत असलेल्या ठिकाणीच मतदान केले, असे आदित्य यांनीच सांगितले होते. पण आता राहुल गांधींनी हा प्रकार उजेडात आणल्यानंतर त्यांनाही धक्का बसला आहे.
आपण मतदारयादीतील नाव दुसरीकडे शिफ्ट केल्यानंतर आधीचे नाव वगळले जाईल, असे आपल्याला वाटल्याचे आदित्य यांनी सांगितले. पण तसे झालेच नाही. त्यामुळे तीन ठिकाणी मतदारयादीत नाव दिसत असल्याचेही ते म्हणाले. इथेही आयोगाच्या कामकाजातील त्रुटी समोर आल्या आहेत. राहुल गांधी यांनी दिलेली ही दोन्ही उदाहरणे प्रत्यक्ष पडताळणीमध्येही खरी असल्याची सिध्द झाली आहेत. पण याला निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार म्हणावा की मतांची चोरी, हे निवडणूक आयोगच सांगू शकते.
निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांमधील हे घोळ तपासण्याची कसलीही यंत्रणा अजूनही नाही, हे खरे दुर्दैव आहे. देशात एवढी वर्षे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान होत आहे. पण मतदारांची ऑनलाईन पडताळणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही, हे धक्कादायक आहे. त्यामुळेच मग राहुल गांधी यांच्याकडून होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे, अशी लोकांची धारणा झाली तर त्यात चूक काय?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.