डोंबिवली : शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याचे वादळ अद्याप शमले नसतानाच डोंबिवलीत घडणाऱ्या घडामोडींमुळे या वादाला वेगवेगळे तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या वतीने डोंबिवली पूर्वेला संजय राऊत (Sanjay Raut) यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनर वरील राऊत यांच्या फोटोवर अज्ञात इसमाने वार करून हा बॅनर फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी शिवसेनेच्या वतीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत असून यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut Latest News)
विविध उत्सवाच्या निमित्ताने शहरात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. डोंबिवली पूर्वेला पेंडसेनगर परिसरात यादव डेअरी जवळ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी संजय राऊत यांना समर्थन देणारा तसेच नवरात्रीच्या शुभेच्छा देणारा कापडी बॅनर लावला होता. या बॅनरवर राऊतांसह अनेक स्थानिक मोठ्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत होते.
एका अज्ञात इसमाने गुरुवारी (ता.६ऑक्टोबर) रात्री या बॅनरवरील राऊतांच्या फोटोवर वार करीत हा फोटो फाडला. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती उपशहर प्रमुख तेलगोटे यांना कळवली. त्यांनी तातडीने ही बाब शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांना सांगितली. त्यानंतर प्रकाश तेलगोटे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या खोडसाळ आणि घाणेरड्या कृतीचा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत असून पोलीस प्रशासनाने देखील सदर घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान, बॅनर वरील खासदार राऊत यांचा फोटो फडण्यात आल्याने हा खोडसाळपणा विरोधी गटाने केला असल्याची चर्चा ठाकरे गटात रंगली आहे. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील दसरा मेळाव्यातील वाद अद्याप मावळला नसून डोंबिवलीत घडणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे याला वेगळे राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.